Nagar Palika Nagar Panchayat Election। राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी सुरु होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी होणार आहे. दरम्यान, पुढील चार-पाच तासांमध्ये निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कोण या निवडणुकीत बाजी मारणार हे लवकरच समोर येणार आहे. राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा , नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार, आज महाराष्ट्रभरातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्त्वाचा निकाल दिलेला. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्यानं राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला पार पडली. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा 20 नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे, 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील 264 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान झालं होतं. तसेच, सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार, 24 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान घेतले जाणार आहे. या सर्व ठिकाणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.