नाशिक : नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रभाग क्रमांक 31मध्ये इच्छुक असलेल्या शिवा तेलंग यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिला आहे. शिवा तेलंग यांच्या इशाऱ्यानंतर नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एवढचं नाही तर शिवा तेलंग यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांवर सविस्तर पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा वाद उफाळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शिवा तेलंग यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पत्रात आत्महत्येस अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, विजय करंजकर यांना जबाबदार धरावं असा इशाराही त्यांनी दिला आहे. तर त्यांनी महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. हि पोस्ट केल्यानंतर शिवा तेलंग हे नॉट रिचेबल झाले आहेत. शिवा तेलंग यांनी पत्रात काय लिहिले? शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 31 मधील आत्तापर्यंत मी शिवा तेलंग आणि माझी पत्नी पूजा तेलंग आम्ही दोघांनी शिवसेना पक्षात 2022 मध्ये प्रवेश करून पक्षाच्या माध्यमातून लोकांची समाज सेवा केली. प्रभागात अनेक विकास कामे केले लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही दोघेपण उभा राहिलो, पक्षाचे नाव चर्चेत ठेवलं पक्षाच्या नावाने अनेक मोठे मोठे कार्यक्रम केले. पक्षाने काही जबाबदाऱ्या दिल्या त्या आम्ही पार पाडल्या पण माझ्या येथे माजी नगरसेवक सुदाम ढेमसे या व्यक्तीने आमचा फक्त वापरच केला आहे. पक्षाच्या प्रवेशाच्या दिवशी मोठ्या निधीच्या कमिटमेंट करून त्यांनी पक्षात प्रवेश केला त्यानंतर प्रभागामध्ये अकरा कोटी रुपयांचा निधी आला पण त्या निधीचे फक्त भूमिपूजन झाले काम कुठे पण झालं नाही आलेला निधी गेला कुठं? याची पण चौकशी झाली पाहिजे माझ्याबरोबर राहून माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे असे शिवा तेलंग यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे. तसेच माझ्या आत्महत्येस अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, विजय करंजकर यांना जबाबदार धरावं. महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचाही आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे.