Municipal Election Exit Poll: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्या शुक्रवारी 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर कोणत्या महानगरपालिकेत कोणता पक्ष सत्ता स्थापन करेल हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. मात्र आज मतदानानंतर लगेच एक्झिटपोलचे आकडे समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला तीन महानगरपालिकेत सर्वांधिक जागा मिळत असल्याची आकडेवारी एक्झिट पोलमध्ये समोर येत आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, ठाणे महानगरपालिकेत शिंदेसेना 72, भाजप 26, राष्ट्रवादी एसपी 15, राष्ट्रवादी अजित पवार 10, ठाकरेसेना 3, काॅंग्रेस 3 आणि मनसे 2 जागा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेत शिंदे सेनेला २९ , भाजपाला २८, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला ४ जागा मिळू शकतात असे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच इतरांच्या स्थानिक जागा आहेत त्यांना १२, काँग्रेसला २, ठाकरेसेना १, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १५, तर मनसेला २ जागा मिळण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला ५७ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप ४२ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. मनसे ६ जागांवर, काँग्रेस २ जागांवर, शिवसेना ठाकरे गट २ जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस गट २ जागांवर, वंचित बहुजन आघाडी २ जागांवर आणि इतर ६ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे फक्त अंदाज आहेत. अधिकृत निकाल उद्या सायंकाळपर्यंत जाहीर होतील.