Mumbai News : रोज वेळेवर घरगुती जेवण पोहोचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा काही दिवसांसाठी बंद राहणार आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनकडून 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत डबे वितरण सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त दरवर्षी घेतली जाणारी ही सुट्टी असल्याचे असोसिएशनने सांगितले. या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबई आणि उपनगरांमध्ये डबेवाल्यांची सेवा मिळणार नाही. त्यामुळे लाखो नोकरदारांना पर्यायी जेवणाची व्यवस्था करावी लागणार आहे. अनेक वर्षांपासून अखंडपणे सेवा देणारे डबेवाले या काळात गावी जाऊन धार्मिक विधी आणि पारंपरिक उत्सवांमध्ये सहभागी होतात. मुंबईतील बहुतांश डबेवाले मुळशी, मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, अकोला आणि संगमनेर या ग्रामीण भागातून आलेले आहेत. गावी होणाऱ्या जत्रा, कुलदैवताची पूजा आणि शेतीच्या कामांसाठी ते दरवर्षी ही सुट्टी घेतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून कायम ठेवण्यात आली आहे. या काळात सेवा बंद असली तरी ग्राहकांनी डबेवाल्यांचा पगार कापू नये, अशी विनंती असोसिएशनकडून करण्यात आली आहे. डबेवाल्यांची सेवा वर्षभर नियमित आणि वेळेवर सुरू असते. त्यामुळे या काही दिवसांच्या सुट्टीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डबे सेवा बंद असल्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बाहेरून जेवण मागवणं किंवा घरून वेगळी व्यवस्था करणं आवश्यक ठरणार आहे. अचानक अडचण येऊ नये म्हणून आधीच नियोजन करण्याचा सल्ला दिला जात आहे.