Devendra Fadnavis : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर कालच सर्वच महापालिकांसाठी महापौर पदाची आरक्षण सोडत मुंबईत जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेत हालाचालींना वेग आला आहे. या महापालिकेत अतिशय नाट्यमय घडामोडी घडत असून, निवडणुकीनंतर मनसेने थेट शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दर्शवत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या सगळ्या घडामोडीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “सध्या मी दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्री केलं आहे. भारतात पुन्हा आल्यावर मुंबईत जे करार झालेत त्यासंदर्भात उत्तरं देतो,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर दिली. त्यांनी स्पष्टपणे बोलणे टाळले असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरून आज रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे फडणवीस मुंबईत आल्यानंतर नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत महापौर पद ते अनुसूचित जमाती (ST) साठी राखीव झाले आहे. ११२ सदस्य असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे अनुसूचित जमातीचे दोन नगरसेवक असल्याने पक्षात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या आरक्षणामुळे शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल आणि किरण भांगले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शीतल मंढारी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिंदेसेनेच्या दोन्ही दावेदारांना अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे युवा महापौर की महिला महापौर, कुणाला कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर पदाची संधी दिली जाणार याकडे लक्ष असणार आहे. अशातच मुंबई महापालिका उल्हासनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यासारख्या महत्वाच्या महापालिकेतील महापौरपदासाठी बराच खल सुरू असल्याचे चित्र आहे. खासदार डॅा. श्रीकांत शिंदे काय म्हणाले?कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे ५३ नगरसेवक घेऊन आम्ही गट स्थापनेसाठी कोकण भवन येथे आलो होतो. इथे शिवसेनेला मनसेचे जे पाच नगरसेवक आहेत, त्यांनी पाठिंबा जाहीर केला. विकासाच्या मुद्द्यावरून विकासामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मनसेने आम्हाला समर्थन दिले आहे, अशी प्रतिक्रिया खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांनी दिली. हेही वाचा : Leopard Cub Dead: बिबट्यांच्या झुंजीत बछड्याचा बळी? राजुरी परिसरात भीतीचे सावट; वनविभागाकडून तपास सुरू