MNS : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा) ने जबरदस्त कामगिरी करत अनेक शहरांवर आपली सत्ता मजबूत केली आहे. विशेषतः मुंबई महापालिका (BMC) मध्ये भाजपा-एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने मिळून ११८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यातील भाजपाने एकट्याने ८९ जागा जिंकल्या, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने २९ जागा मिळवल्या. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी बहुमतासाठी ११४ जागांची आवश्यकता असताना महायुतीने हे पार केले. मुंबई ही पारंपरिकपणे ठाकरे कुटुंबची (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना) मजबूत जागा होती. मात्र, यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतरही त्यांना मोठा धक्का बसला. शिवसेना (UBT) ला ६५ जागा मिळाल्या, तर मनसेला फक्त ६ जागा मिळाल्या. राज ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी ठामपणे सांगितले होते की, “मुंबईचा महापौर आमचाच होईल आणि तो मराठीच असेल.” मात्र, हा दावा खोटा ठरला असून, मुंबईचा महापौर आता महायुतीकडूनच (भाजपा किंवा मित्रपक्ष) होणार आहे. मनसेला सर्वात मोठा फटका या निवडणुकीत सर्वाधिक धक्का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) बसला आहे. २०१७ च्या निवडणुकीत मनसेने २६ जागा जिंकल्या होत्या, पण यावेळी राज्यभरात मनसेला अवघ्या १२-१३ जागा मिळाल्या. मुंबईत तर फक्त ६ जागा मिळाल्या. युती असूनही वरळी, माहीम, दादर सारख्या पारंपरिक भागांत मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. काही ठिकाणी जाणीवपूर्वक दुसरे उमेदवार उभे करून मनसेचा वापर केल्याचा आरोप होत आहे. संतोष धुरींची तीव्र प्रतिक्रिया निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे प्रभावी नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत संदीप देशपांडे यांचाही प्रवेश होणार असल्याच्या चर्चा होत्या. धुरी यांनी मनसेत २२ वर्षे काम केले असले तरी तिकिट न मिळाल्याने आणि कदर न झाल्याने ते नाराज होते. पराभवानंतर संतोष धुरी यांनी राज ठाकरे आणि मनसेला लक्ष्य करत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, “मनसेत असणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या अनेकांनी भाजपात येण्याचे भाकीत केले होते. मनसेची चेष्टा झाली – कुटुंब एकत्र आले तरी फक्त ६ जागा! यापूर्वी ८ जागा जिंकल्या होत्या. जागा वाटपात गोंधळ घातला, दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मनसेचा वापर केला जातो.” ते पुढे म्हणाले, “वरळीतील १ जागा जिंकली नाही, जाणीवपूर्वक शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला. माहीम, दादर येथे काय फरकाने जागा आल्या हे पाहायला हवे. बाहेर पडलो म्हणून गद्दार म्हणाल? राज ठाकरे यांनी किती वेळा दुसऱ्यांना जिंकवून आणले, त्यांना फायदा झाला पण मनसेला नाही. वापर करून झाल्यावर गोष्टी टिकतात का? आता वापर करून झालेला आहे!” राज्यातील इतर महापालिकांमध्येही महायुतीची (भाजपा-शिंदे सेना) प्रबळ कामगिरी दिसली असून, भाजपाने विकास आणि हिंदुत्वाच्या अजेंड्याने मतदारांना आकर्षित केले. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये महायुतीची सत्ता प्रस्थापित होत असताना, आगामी काळात शहरांच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.