Pakistan News: पाकिस्तानमध्ये दहशतवादी हिंसाचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बाजौर जिल्ह्यात सोमवारी झालेल्या एका भीषण आत्मघाती हल्ल्यात ११ सुरक्षा रक्षकांसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तपास चौकीला लक्ष्य करत स्फोट – पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगने (ISPR) दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली एक गाडी लष्कराच्या आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त तपास चौकीवर धडकवली. सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी गाडी थेट चौकीच्या भिंतीवर नेऊन आदळली. या स्फोटात ७ जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. १२ दहशतवाद्यांचा खात्मा – लष्कराने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देत १२ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या निवासी इमारतींचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या या भागात इतर लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम (Search Operation) राबवण्यात येत आहे. हेही वाचा – तारिक रहमान बनले बांगलादेशचे पंतप्रधान, ‘या’ नेत्यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ ‘फितना-अल-ख्वारिज’ कडून हिंसाचार – पाकिस्तानी सरकार आणि लष्कर ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (TTP) या संघटनेचा उल्लेख ‘फितना-अल-ख्वारिज’ असा करते. गेल्या काही वर्षांपासून टीटीपीने पाकिस्तानमध्ये अनेक आत्मघाती हल्ले घडवून आणले आहेत. “दहशतवादाचा बीमोड करेपर्यंत आमची मोहीम सुरूच राहील,” असे लष्कराने ठामपणे म्हटले आहे. दहशतवादाचे सावट गडद – पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी इस्लामाबादमधील शिया मशिदीत जुम्म्याच्या नमाजदरम्यान झालेल्या स्फोटात ३० हून अधिक जण मारले गेले होते. याची जबाबदारी ‘इस्लामिक स्टेट’ने घेतली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डेरा इस्माइल खान येथे झालेल्या हल्ल्यात ७ पोलीस अधिकारी शहीद झाले होते. पाकिस्तानने वारंवार अफगाणिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे, मात्र तालिबान सरकारने हे आरोप नेहमीच फेटाळून लावले आहेत. या ताज्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.