Manikrao Kokate : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना दोन वर्षांची शिक्षा व ५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. माणिकराव कोकाटे अटक टाळण्यासाठी काय करू शकतात? जर सजाप्राप्त आरोपी पोलिसांच्या संपर्कात असेल आणि सरेंडर होण्यासाठी त्याने पुराव्यासहित सबळ कारणे दिली असतील अटक काही दिवस टळू शकते. वैद्यकीय कारण हे अत्यंत सबळ कारण मानलं जाते. मात्र त्या आरोपीवर सुरू असलेले उपचार आणि हॉस्पिटल अहवाल हा महत्वाचा घटक मानला जातो. लीलावती हॉस्पिटलचा, नाशिक पोलिसांना सादर होणारा प्रकृती अहवाल हा यात महत्त्वाचा ठरणार आहे. कोकाटे यांच्या आरोग्य अहवालाच्या आधारावर नाशिक पोलीस काही दिवस अटक टाळू शकतात. अर्थात हॉस्पिटल अरेस्ट हा एक मार्ग असला तरी त्याची अंमलबजावणी ही पूर्णपणे नाशिक पोलिसांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. माणिकराव कोकाटे याना कोणत्याही परिस्थितीत अजून दोन दिवस अटक टाळायची आहे. १९ डिसेंबरला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला नाही तर त्यांना सरेंडर व्हावे लागेल किंवा पोलिस हॉस्पिटल अरेस्ट करू शकतील. कृषिमंत्री कोकाटे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे आमदार आहेत. विधानसभेत रम्मी खेळण्यामुळे अडचणीत आल्यानंतर त्यांचे कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आले. यानंतर त्यांना युवक कल्याण आणि क्रीडाखाते देण्यात आले होते. १९९५ ते ९७ काळात सरकारच्या १० टक्के कोट्यातून कोकाटे यांनी घर घेतले. कोकाटे यांनी १० टक्के कोट्यातील घरासाठी कमी उत्पन्न दाखवले असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल केला होता. जवळपास तीन दशके या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटेंविरोधात याचिका दाखल केली होती. दिघाळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कोकाटेंविरोधात भादंवि ४२०, ४६५, ४७१,४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांच्या भावाच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.