Malegaon Mayor Election : मालेगाव महापालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणूक पार पडल्यानंतर काही तासांतच महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्ट अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही काळ संपूर्ण महापालिकेत एकच गोंधळ उडाला होता. लिफ्टमध्ये 18 जण अडकले अपघाताच्या वेळी लिफ्टमध्ये एकूण 18 जण होते. क्षमतेपेक्षा अधिक भार आणि लिफ्टची चैन तुटल्यामुळे लिफ्ट खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चौथ्या मजल्यावरून खाली येताना लिफ्ट थेट तळमजल्यापर्यंत न जाता पहिल्या मजल्यावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे नेते आणि माजी आमदार आसिफ शेख, मुश्तकिन डिग्निटी, काही नगरसेवक तसेच पाच पत्रकार अडकले होते. लिफ्ट कोसळताच महापालिका इमारतीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाची तातडीची कारवाई घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून विशेष प्रयत्नांद्वारे लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना एकामागोमाग एक सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सर्वजण सुखरूप असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. दरम्यान, मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टीने काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली आहे. शेख नसरीन बानो खालिद (इस्लाम पार्टी) महापौर तर शान-ए-हिंद (समाजवादी पार्टी) उपमहापौर पदी निवड झाली आहे. महापौरपदाच्या थेट लढतीत शेख नसरीन बानो खालिद यांनी 43 मते मिळवत शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांचा 25 मतांनी पराभव केला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही शान-ए-हिंद यांनी 43 मते मिळवत शिवसेनेचे ॲड. निलेश काकडे यांच्यावर निर्णायक विजय मिळवला. या निवडणुकीत भाजप आणि एमआयएम तटस्थ राहिले. जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.