Weather Alert : महाराष्ट्रातील हवामानात फेब्रुवारी महिन्यात सातत्याने बदल जाणवत आहेत. 9 फेब्रुवारी रोजी राज्यात हवामान मुख्यतः कोरडे ते हलके ढगाळ आणि उष्ण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवारी राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. थंडीचा प्रभाव कमी होत असून, कमाल तापमान सामान्यपेक्षा थोडे जास्त राहणार आहे. किमान तापमानात मात्र फारसा बदल होणार नाही. कोकणात उबदार वातावरण कोकण विभागात कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस राहील. आकाश मुख्यतः निरभ्र ते हलके ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळी काही भागात धूसरता किंवा हलके धुके जाणवू शकते, तर दुपारनंतर उष्णता वाढेल. समुद्रकिनारी आद्रता राहील, मात्र पावसाचा कोणताही अंदाज नाही. पश्चिम महाराष्ट्रात थंडी कमी, उकाडा वाढणार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान 15 ते 19 अंश सेल्सिअस राहील. दिवसभर कोरडे आणि सूर्यप्रकाशयुक्त हवामान राहणार असून सकाळी थोडी थंडी तर दुपारी उकाडा जाणवेल. उत्तर महाराष्ट्रात स्थिर हवामान उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात कमाल तापमान 28 ते 31 अंश आणि किमान 14 ते 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान कोरडे आणि स्वच्छ राहील, तर काही ठिकाणी हलके ढग दिसू शकतात. मराठवाड्यात उन्हाचा चटका मराठवाड्यात थंडीचा जोर ओसरत असून उन्हाची तीव्रता वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान 29 ते 32 अंश, तर किमान 15 ते 19 अंश सेल्सिअस राहील. दिवस उष्ण, तर रात्री हलकी थंडी जाणवेल. विदर्भातही उष्णतेत वाढ विदर्भातील नागपूरसह सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान 30 ते 33 अंश, तर किमान 16 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. हवामान कोरडे आणि उष्ण राहणार असून रात्री थोडी थंडी जाणवेल. पुढील 7 दिवसांचा अंदाज पुढील सात दिवसांत राज्यात पावसाची शक्यता नसून तापमानात मोठे चढ-उतार होणार नाहीत. मात्र किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे थंडी आणखी कमी होईल.