Chhagan Bhujbal : “महाराष्ट्र सदन प्रकरणात आज न्यायालयाने आम्हाला दोषमुक्त केले आहे. सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला आहे.” अशी पहिली प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यांच्यावरील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले आहे. गेल्या अनेक वर्षांत आम्ही न्यायप्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवून संयमाने वाट पाहिली. या काळात माझ्या कुटुंबाने, सहकाऱ्यांनी आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. यापुढील काळातही अधिक जोमाने जनतेच्या सेवेसाठी आम्ही सगळेच काम करत राहू, असे देखील भुजबळ म्हणाले आहेत. हेही वाचा : Maharashtra Election News: सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र, राजकीय वर्तुळात खळबळ कथित महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या घोटाळा प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषीमुक्त ठरवले आहे. त्यामुळे भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नेमकं प्रकरण काय आहे? २००४ ते २००६ या काळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. या प्रकल्पात काही आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. यानंतर या प्रकरणामुळे भुजबळ यांना काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला होता. या आरोपांमुळे छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला मोठा तडा गेला होता. भुजबळांवर कोणते आरोप होते? बांधकामाच्या कंत्राटात नियम मोडले गेले आणि पैसे चुकीच्या पद्धतीने वापरले गेले असा दावा होता. ईडीकडे हे प्रकरण आल्यानंतर यात मनी लॉन्डरिंगचा मुद्दा उपस्थित केला. एकूण ४६ जणांवर हे आरोप होते, ज्यात ठेकेदार आणि अधिकारी सामील होते. या आरोपांमुळे छगन भुजबळ यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात आली होती. कंत्राट देताना पक्षपात केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, भुजबळ यांनी होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावत राजकीय ट्रॅप रचल्याचे वेळोवेळी सांगितले होते. या प्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबीयांना देखील मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा ब्रेक लागला. मात्र, त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात कमबॅक केले. छगन भुजबळ या प्रकरणाची स्वंतत्र चौकशी ईडी अर्थात सक्तवसुली संचालयाने सुरू केली. न्यायालयात अनेक सुनावण्या झाल्या आणि पुरावे सादर करण्यात आले. या प्रकरणात एसीबीने भुजबळ यांना दोषमुक्त केले होते. मात्र, ईडीकडे प्रकरण सुरूच राहिले. ही प्रक्रिया पुढे अनेक वर्ष सुरू राहिली. अखेर पुराव्यांचा अभ्यास केल्यांतर आणि वकीलांच्या युक्तिवादांमुळे मुंबईतील विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह ४६ जणांना दोषमुक्त केले आहे. हेही वाचा : Zilla Parishad Elections : झेडपी आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य? महसूल मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती