Maharashtra Politics : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागले असून, भारतीय जनता पार्टी (भाजप) हा स्पष्टपणे सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने एकट्याने अनेक महापालिकांवर एकहाती सत्ता मिळवली असून, महायुती (भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गट) युतीने जवळपास २५ पेक्षा अधिक महापालिकांवर विजय मिळवला आहे. जनतेने या निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या बाजूने स्पष्ट कल दाखवला आहे. या निकालाचा सर्वांत मोठा फटका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या विरोधी पक्षांना बसला आहे. मात्र, काँग्रेसने राज्यातील अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत आपली उपस्थिती दाखवली आहे. महापौरपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते महापौरपदाच्या निवडीकडे. राज्यातील काही महापालिकांमध्ये पक्षीय बलाबल पाहता घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे. मुंबई महापालिका: बहुमत असूनही सस्पेन्स कायम मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला ८९ जागा मिळाल्या, तर शिवसेना शिंदे गटाला २९ जागा मिळाल्या. एकूण महायुतीकडे ११८ जागा (बहुमतासाठी ११४ आवश्यक) असून, सत्ता निश्चित आहे. मात्र, भाजपाला एकट्याने स्पष्ट बहुमत नसल्याने महापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाची मदत घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर घोडेबाजार टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व २९ नगरसेवकांना मुंबईतील लग्जरी हॉटेलमध्ये हलवले आहे. शिंदे गटाने भाजपाकडे अडीच वर्षे महापौरपद आपल्याला द्यावे, अशी मागणी केली आहे. मात्र, भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, महापौर महायुतीचा असेल आणि निर्णय एकत्र घेतले जातील. यामुळे मुंबईत महापौर कोण होणार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. मुंबईच्या घडामोडींसोबतच आता चंद्रपुरमहापालिकेतूनही मोठी बातमी समोर येत आहे. येथे महापौरपदासाठी काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोडी उघडकीस आली आहे.विजय वडेट्टीवार गटाचे १५ नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.तर दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांच्या गटाने १२ नगरसेवकांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे. येत्या दोन दिवसांत महापौरपदासाठी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता असल्याने, चंद्रपुरात महापौर कोण होणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाला महापौरपद मिळवणे कठीण जाणार असल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीचा स्पष्ट विजय झाला असला तरी महापौरपदाच्या निवडीसाठी अनेक ठिकाणी अंतर्गत तणाव, मागण्या आणि घोडेबाजाराची भीती आहे. मुंबई आणि चंद्रपुरातील घडामोडी पाहता, पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात नवे वळण लागण्याची शक्यता आहे.