Laxman Hake : महाराष्ट्राच्या राजकारणात 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल पाहायला मिळू शकतात. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याची शक्यता असून, सध्या सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार यांच्यासोबत युती करू शकतात, असा खळबळजनक दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते रविवारी सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. लक्ष्मण हाके यांच्या मते, 2029 मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी हे तीन पक्ष एका आघाडीत असतील. दुसरीकडे भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. पंचायत राज निवडणुकांमधील युती आणि स्थानिक पातळीवरील राजकीय हालचाली पाहता हे नवीन ध्रुवीकरण स्पष्ट होत असल्याचे हाके यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत बोलताना हाके म्हणाले की, मनसेला सध्या जनाधार उरलेला नाही. सातत्याने बदलणाऱ्या भूमिकांमुळे राज ठाकरे यांना पुढील काही वर्षे अधिक तयारी करण्याची गरज आहे. अलीकडच्या काळात एकनाथ शिंदे गटातील मंत्री आणि नेते भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणणारी वक्तव्ये करत असल्याचे दिसत आहे. तसेच महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत शिंदे गटाने भाजपविरोधी भूमिका घेत राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्याचे चित्रही अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहे. या सर्व घडामोडींमुळे 2029 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर होणार असून, त्याची सुरुवात पंचायत राज निवडणुकांतूनच झाल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.