नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व खदखद फेम नितेश कराळे उर्फ कराळे मास्तर (Karale Master) हे आपल्या बेधडक व बेफाम वक्तव्यांमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. नुकतेच नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कराळे मास्तरांनी केलेल्या एका वक्तव्यमुळे नव्या वादाला तोंड फुटले असून त्यामुळे समोरील अडचणी वाढणार आहेत. कराळे मास्तरांना अटक होणार? नाशिकमध्ये २०२७ कुंभमेळा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर साधूंविषयी कराळे यांनी अपशब्द वापरल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्यासाठी २५ हजार कोटी रुपयांचा जो खर्च करण्यात येत आहे तो फालतू आहे. कुंभमेळ्यात साधू हे गांजा फुंकण्यासाठी येतात असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कोण आहेत कराळे मास्तर? कराळे मास्तर म्हणजे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध शिक्षक आणि सोशल मीडिया स्टार नितेश कराळे (Nitesh Karale) आहेत.ते फिनिक्स अकॅडमीचे संचालक आहेत आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांची खास वैशिष्ट्य म्हणजे वऱ्हाडी (विदर्भी) बोलीभाषेत शिकवण्याची आगळीवेगळी शैली, ज्यामुळे ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. विशेषतः भूगोल विषयातील “खदखद” हा व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाला, त्यामुळे त्यांना “खदखद मास्तर” किंवा “कराळे मास्तर” म्हणून ओळखले जाते. लॉकडाऊनपासून त्यांचे ऑनलाइन क्लासेस आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाले. ते शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवरही आवाज उठवतात.राजकारणातही त्यांनी प्रवेश केला आहे:ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश प्रवक्ता आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक होते (वर्धा, आर्वी इत्यादी मतदारसंघ). २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून काम केले, पण काही वादांमध्येही अडकले आहेत.