Jyoti Yarraji Video : दक्षिण कोरियाच्या गुमी शहरात २७ ते ३१ मे २०२५ दरम्यान आयोजित २६व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत एकूण २४ पदकांची कमाई केली. यात ८ सुवर्ण, १० रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. या कामगिरीमुळे भारताने पदकतालिकेत दुसरे स्थान पटकावले, तर चीनने पहिले स्थान मिळवले. भारतीय ॲथलीट्सनी विविध स्पर्धांमध्ये विक्रम मोडले आणि देशाचे नाव उज्वल केले. या स्पर्धेतील सर्वांत चर्चेचा विषय ठरला तो भारतीय स्टार हर्डलर ज्योती याराजीचा (Jyoti Yarraji Video) सुवर्णपदक विजय आणि त्यानंतरचा भावूक क्षण, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्योती याराजीने महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत (१०० मीटर हर्डल्स) दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. तिने केवळ १२.९६ सेकंदांत शर्यत पूर्ण करून नवीन चॅम्पियनशिप विक्रम प्रस्थापित केला. ही वेळ तिच्या या सीझनची सर्वोत्तम कामगिरी ठरली असून, तिने गतवर्षीच्या विक्रमाला मागे टाकले. ज्योतीने सलग दुसऱ्यांदा हा किताब जिंकला, ज्यामुळे ती आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सलग दोन सुवर्णपदके जिंकणारी निवडक ॲथलीट्सच्या यादीत सामील झाली. शर्यतीत सुरुवातीला मागे असूनही तिने शेवटच्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारत जपान आणि चीनच्या स्पर्धकांना मागे टाकले. मात्र, या विजयाचा सर्वांत हृदयस्पर्शी भाग होता तो पदक वितरण सोहळा. स्पर्धेदरम्यान पावसामुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांची गर्दी नव्हती – संपूर्ण मैदानात फक्त शुकशुकाट आणि पावसाची रिपरिप होती. अशा निर्जन वातावरणात जेव्हा भारतीय राष्ट्रगीत वाजले आणि तिरंगा फडकला, तेव्हा ज्योतीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. हा भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. चाहते आणि क्रिकेटप्रेमींनी या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिला, ज्यात ज्योतीच्या संघर्षमय प्रवासाची आणि देशप्रेमाची भावना दिसून येते. पावसामुळे रिकामे स्टेडियम असूनही ज्योतीचा विजय अधिकच प्रेरणादायी ठरला. Empty stadium, no cheer .. just by herself 🫡 Carrying our 🇮🇳’s pride in silence 🔥 That’s @JyothiYarraji athelete winning a gold in 100m hurdles on 29th May 2025 at the 26th Asian Athletics Championships Look up her journey & feel the pride in her teary eyes 🥹 We’re proud of… pic.twitter.com/UocdRX9heO — ExtraSpiceAni (@ShrivastavAni) December 22, 2025 या स्पर्धेत भारताच्या इतर ॲथलीट्सनीही कमाल केली. अविनाश साबळेने पुरुषांच्या ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकत ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला. गुलवीर सिंगने ५००० मीटर आणि १०००० मीटरमध्ये दुहेरी सुवर्ण मिळवले, तर पूजा सिंग (उंच उडी), नंदिनी अगासारा (हेप्टॅथ्लॉन) आणि महिलांच्या ४x४०० मीटर रिले संघानेही सुवर्णपदके जिंकली. एकूण ६० हून अधिक भारतीय ॲथलीट्सनी स्पर्धेत भाग घेतला आणि देशाला अभिमानास्पद कामगिरी करून दिली. कोण आहे ज्योती याराजी? ज्योती याराजी हिचा जन्म २८ ऑगस्ट १९९९ रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका साधारण कुटुंबात झाला. तिचे वडील सूर्यनारायण खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर आई कुमारी रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी आणि घरकाम करून कुटुंबाला हातभार लावतात. कुटुंबाचे मासिक उत्पन्न सुमारे १८ हजार रुपयांपेक्षा कमी होते, ज्यातून घरखर्च आणि शिक्षण सांभाळणे कठीण होते. अशा मर्यादित परिस्थितीत वाढलेल्या ज्योतीने शालेय काळातच ॲथलेटिक्सकडे वळून आपले ध्येय निश्चित केले. तिच्या शारीरिक शिक्षकाने तिच्यातील हर्डल्सची क्षमता ओळखली आणि तिला प्रोत्साहन दिले. कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर ज्योतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्वल केले. ती भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आहे आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेती आहे. तिचा प्रवास आजच्या तरुणांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणास्रोत ठरतो. ज्योती सध्या रिलायन्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये ब्रिटिश कोच जेम्स हिलियर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ज्योती याराजी हिची कामगिरी आणि विक्रम महिलांची 100 मीटर हर्डल्स – राष्ट्रीय विक्रम : 12.78 सेकंद महिलांची 60 मीटर हर्डल्स (इनडोअर) – राष्ट्रीय विक्रम : 8.13 सेकंद 100 मीटर हर्डल्समध्ये 20 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 (बँकॉक) – 100 मीटर हर्डल्स : सुवर्णपदक FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2023 (चेंगदू) – 100 मीटर हर्डल्स : कांस्यपदक आशियाई इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 (नूर-सुल्तान) – 60 मीटर हर्डल्स : रौप्यपदक आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 (बँकॉक) – 200 मीटर : 23.13 सेकंदांचा वैयक्तिक सर्वोत्तम वेळ, रौप्यपदक आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 – 100 मीटर हर्डल्स : रौप्यपदक 2024 साली भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 (गूमी) – 100 मीटर हर्डल्स : सुवर्णपदक आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मधील भारताची ही कामगिरी देशातील ॲथलेटिक्सच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. ज्योती याराजीचा भावूक विजय आणि व्हायरल व्हिडिओ यामुळे लाखो तरुणांना प्रेरणा मिळाली असून, भविष्यात तिच्याकडून जागतिक स्तरावर आणखी मोठ्या यशाची अपेक्षा आहे.