Shooting Coach Sexual Harassment : भारतीय क्रीडा विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि लज्जास्पद घटना समोर आली आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका राष्ट्रीय स्तरावरील १०-मीटर एअर पिस्तूल अल्पवयीन नेमबाजाने भारतीय शूटिंग टीमचे कोच अंकुश भारद्वाज याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पीडितेने सविस्तर तक्रार दाखल केल्यांनंतर फरीदाबादच्या एनआयटी पोलीस ठाण्यात आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोच पदावरून निलंबित करण्यात आले आहे. नेमकी घटना काय? ही घटना १६ डिसेंबर २०२५ रोजी घडली आहे. पीडित खेळाडू दिल्लीतील डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंजवर नॅशनल मॅच खेळत होती. सामना संपल्यानंतर कामगिरीवर चर्चा (Analysis) करण्याच्या बहाण्याने कोच अंकुश भारद्वाज याने तिला सुरजकुंड येथील हॉटेल ताजमध्ये बोलावले. सुरुवातीला तिला लॉबीमध्ये थांबण्यास सांगितले, मात्र नंतर ‘महत्त्वाचे बोलायचे आहे’ असे सांगून ते तिला आपल्या खासगी खोलीत घेऊन गेले. मदतीच्या बहाण्याने गैरवर्तन आणि धमकी – पीडितेने तक्रारीत नमूद केल्यानुसार, खोलीत चर्चा सुरू असताना तिने आपल्या पाठ आणि खांद्यात वेदना होत असल्याचे सांगितले. त्यावेळी मदतीच्या बहाण्याने कोचने तिला बेडवर झोपण्यास सांगितले आणि तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पीडितेने आरडाओरडा करून विरोध केल्यावर तो मागे हटला. हॉटेलमधून बाहेर पडताना, “कोणाला काही सांगितले तर तुझे करिअर आणि कुटुंब उद्ध्वस्त करून टाकीन,” अशी धमकीही त्याने दिली. हेही वाचा – WPL 2026 बिगुल वाजलं! पहिल्याच सामन्यात मुंबई आणि आरसीबी आमनेसामने; फ्रीमध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या अनेक मुलींना बनवले शिकार? धक्कादायक बाब म्हणजे, अंकुश भारद्वाज याने अशाच प्रकारे इतरही काही महिला खेळाडूंशी गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. तक्रारीत १० डिसेंबरच्या एका घटनेचाही उल्लेख आहे, जेव्हा हे कोच मोहाली येथील मुलींच्या रूममध्ये विनापरवाना घुसला आणि त्यांच्या बेडवर झोपला होता. आपल्या एका मैत्रिणीसोबत चर्चा केल्यानंतर पीडितेने हिंमत एकवटली आणि ४ जानेवारी रोजी आपल्या आईला सर्व हकीकत सांगितली. कोण आहे आरोपी अंकुश भारद्वाज? अंकुश भारद्वाज हा शूटिंग जगतातील मोठे नाव आहे. तो स्वतः कॉमनवेल्थ गेम्सचे पदक विजेता आहेत सध्या तो भारतीय शूटिंग संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याची पत्नी अंजुम मौदगिल दोन वेळची ऑलिम्पियन खेळाडू आहे. मोहालीमध्ये तो ‘साल्वो शूटिंग रेंज’ चालवतो. आता त्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “हे माझ्या विरोधातील मोठे षडयंत्र असून तपासात सत्य बाहेर येईल,” असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. हेही वाचा –Ritika Sajdeh Apartment : मुंबईत ‘हिटमॅन’चा नवा पत्ता! पत्नी रितीकाने सर्वात महागड्या टॉवरमध्ये घेतलं नवीन अपार्टमेंट, किंमत किती? पुरावे नष्ट होण्याची भीती; न्यायाची मागणी – पीडितेच्या आईने प्रशासनाकडे तातडीने न्यायाची मागणी केली आहे. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घ्यावे, जेणेकरून पुरावे नष्ट होणार नाहीत, अशी विनंती त्यांनी केली आहे. आरोपी हा प्रभावशाली व्यक्ती असल्याने तपासात अडथळा येऊ शकतो, अशी भीतीही कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी सूरजकुंड येथील त्या हॉटेलचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून हॉटेल कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.