नवी दिल्ली : पाकिस्तानचे मोहसिन नक्वींचा निर्लज्जपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे. मोहसिन नक्वींनी भारताला विजय मिळवल्यावरही मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफी दिली नाही. आता त्यांनी एक अट ठेवली आहे. जर ट्रॉफी हवी असेल तर त्या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला दुबईत माझ्या कार्यालयात पाठवा मी त्याच्या हातात ट्रॉफी देईन, असे बाष्कळ विधान नक्वींनी केले आहे. यावर अद्याप बीसीसीआयने कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. भारतीय खेळाडूंना आशिया कप स्पर्धा खेळायची नव्हती. पण बीसीसीआयमुळे त्यांना या स्पर्धेत खेळावे लागले. पण भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत आपला स्वाभिमान दाखवला. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी एकदाही टॉसच्यावेळी हात मिळवला नाही. सामना संपल्यावरही भारताच्या एकाही खेळाडूने पाकिस्तानच्या खेळाडूंबरोबर हस्तांदोलन केले नाही. फायनलपूर्वी तर सूर्यकुमार यादवने एक मोठा निर्णय घेतला. आम्ही जर फायनल जिंकलो तर मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेणार नाही, असे सांगितले आणि ते खरेही करून दाखवले. कारण भारताने आशिया कप जिंकला आणि मोहसिन नक्वी भारताला ट्रॉफी देण्यासाठी तयार होते, पण सूर्यकुमार यादवने त्यांच्याकडून ट्रॉफी घेतली नाही. मोहसिन नक्वी यांना आशिया कपची ट्रॉफी ही आपल्या घरची संपत्ती वाटत होती, त्यामुळे ते आशिया कपची ट्रॉफी आपल्या हॉटेलच्या रुममध्ये घेऊन गेले होते. पण त्यानंतर त्यांना ही ट्रॉफी ऑफिसमध्ये नेऊन ठेवावी लागली. अजूनही ती ट्रॉफी तिथेच आहे. आता मोहसिन नक्वी यांनी निर्लज्जपणे भारताला पुन्हा डिवचले आहे. मोहसिन नक्वी यावेळी म्हणाले की, ” मी भारताला आशिया कपची ट्रॉफी द्यायला तयार आहे. पण त्यासाठी एक अट आहे. भारताने त्यांचा कर्णधार सूर्यकुमार यादवला आशिया कपच्या दुबई येथील ऑफिसमध्ये पाठवावे आणि माझ्याकडून ही ट्रॉफी त्याने स्विकारावी. मोहसिन नक्वी हे पुन्हा एकदा भारताला आपल्या समोर झुकवू पाहत आहेत. पण आता भारत त्यांना का उत्तर देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण स्पर्धा जिंकूनही भारताला ती ट्रॉफी अजूनही मिळालेली नाही.