Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर कडवंची शिवारात काल (दि 1 एप्रिल) सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात 8 महिला मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी हे सर्व समृद्धी महामार्गावर स्वच्छतेचे काम करणारे मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मजुरांना घेऊन जाणारा एक मिनी-पिकअप ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना हा भीषण अपघात झाला. या सर्व महिला समृद्धी महामार्गावरील मजूर होत्या आणि त्या वाहनातून प्रवास करत होत्या. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजुरांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक रहिवासी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले. जखमींना प्रथम जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि नंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण समोर प्राथमिक तपासात ट्रक चालकाचा अतिवेग आणि निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताच्या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे जालना जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. तसेच या भीषण अपघातामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, या अपघातामुळे रस्ते सुरक्षा आणि अतिवेगाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारकडून पाच लाखांची आर्थिक मदत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले. मृतांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले की, ही एक अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार पीडितांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांची नावे या अपघातात मृत्यू झालेले सर्व मजूर जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये अलकाबाई दादाराव आदमाने (४५), लक्ष्मीबाई संतोष मदन (३५), मीना परमेश्वर आदमाने (४५) कांचनबाई प्रकाश आदमाने (५०), ताराबाई गहिनाजी चौधरी (६०), कडूबाई रामदास मदन (५५) आणि सुमनबाई कचरू आदमाने (७०) यांचा समावेश आहे. एका मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. हेही वाचा : Divya Dutta : तो सिनेमा ठरला गेमचेंजर! त्यानंतर 20 सिनेमे केले साईने; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ