Hirkani Tiger : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘तारा’ आणि ‘चंदा’ पाठोपाठ आता तिसर्या ‘हिरकणी’ या वाघिणीची डरकाळी घुमणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेल्या या वाघिणीला शनिवारी सह्याद्री कोयना अभयारण्यात निसर्गमुक्त करण्यात आले. सकाळी सहा वाजता पिंजर्यातून बाहेर पडलेली ही वाघीण पिंजर्यातून बाहेर पडून कोअर जंगल क्षेत्रात निघून गेली. पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वन परिक्षेत्रातून दि. 5 रोजी वाघिणीला पकडण्यात आले होते. त्यानंतर तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले. बोटीने प्रवास करून तिला व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना अभयारण्यात शुक्रवारी रात्री आणण्यात आले. त्याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकार्यांनी तिची तपासणी केली. त्यावेळी तिला पाणी व खाद्य देण्यात आले. तसेच शनिवारी सकाळी 6 वाजता पिंजर्याचे दरवाजे उघडून तिला कोयना अभयारण्यातील कोअर जंगल क्षेत्रात सुरक्षितस्थळी मुक्त करण्यात आले. कोयना अभयारण्यात आधीचा असलेला एक नर वाघ ‘बाजी’ (एसटीआर- टी 3) याच्या जोडीला नवीन आणलेली ही वाघीण यापुढे अभयारण्यात पर्यटनवाढीसाठी महत्वाची ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेने व अनेक दुर्मिळ प्रजातीने समृद्ध असा 1 हजार 165 चौरस किलोमीटर परिसरात सातारा, सांगली, कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यांत पसरलेला हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या सूचनांनुसार उपसंचालक किरण जगताप, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाक्के, परिक्षेत्र वनाधिकारी संग्राम गोडसे, अक्षय साळुंखे, विजय बाटे, तुषार जानकर, अक्षय करमळकर, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सुनील भोईटे यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. वाघिणीला ‘एसटीआर-टी 6’ क्रमांक पेंच व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्रीत आणलेल्या या वाघिणीला पेंच प्रकल्पात ‘पीटीआर 123’ हा क्रमांक होता. आता सह्याद्रीमध्ये आल्यावर तिला ‘एसटीआर-टी 6’ हा शासकीय नंबर देण्यात आला आहे. सह्याद्रीमधील गाईड मंडळींनी तिला ‘हिरकणी’ हे नाव दिले आहे.