Hemangi Kavi Post : मराठी मनोरंजन विश्वात दमदार अभिनय आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री हेमांगी कवी सध्या तिच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आहेत. मराठी मालिका इंडस्ट्रीत कलाकारांना मानधन वेळेवर मिळण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो, यावर हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये मन मोकळे केले आहे. २०-२२ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आता तिला स्वतःच्या मेहनतीच्या पैशांसाठी रडून-रडून मागावे लागतात, याची खंत तिने व्यक्त केली आहे. काय लिहिले पोस्टमध्ये? हेमांगीने फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते, “कुठलीही मालिका निवडण्यामागे भूमिका काय आहे, किती महत्वाची आहे हे तर असतेच.सुरुवातीला ‘आपल्याला काम मिळतंय यार’ यातच आनंद असायचा. पण आता २०-२२ वर्ष काम केल्यानंतर मालिकेचा निर्माता कोण आहे हे आधी पाहायला लागलेय. अनेक मालिका केल्या, त्या गाजल्या, भूमिकाही गाजल्या, पण मेहनतीचे पैसे रडून रडून मिळवावे लागले. काही अपवाद सोडता…” तिने काही चांगल्या निर्मात्यांचे कौतुक करताना म्हटले, “कम्माल निर्माते! बोलायच्या-मागायच्या आत चेक हातात मिळायचा. आता ऑनलाइन पेमेंटची सोय झालीय, ठरलेल्या तारखेला थेट बँकेत पैसे जमा करतात. सुख, समाधान! मालिका संपली तरी किंवा बंद झाली तरी पैसे वेळेत मिळणारच.” मात्र, उरलेल्या अनुभवांबाबत ती संतप्त होत म्हणते, “बाकीच्या काहींनी २ वर्षांनी पैसे दिले, काहींनी TDS दिला नाही, तर काहींनी दिलेच नाहीत. जसे काही प्रोडक्शन हाऊस कलाकारांवर फुल्या मारतात, तसेच मी काही प्रोडक्शन हाऊसवर फुली मारलेली आहे. काहींकडे कामही केले नाही, पण त्यांच्याबद्दलची ‘महती’ इतकी ऐकलीये की काम करावेसे वाटत नाही. नावे घेऊन काही फरक पडणार नाही, त्यामुळे उगाच का?” हिंदी मालिकांमधील अनुभवाची तुलना करत ती पुढे म्हणते, “मधे-मधे हिंदी भाषिक मालिकांमध्ये काम करते. शेवटी पोट आहे ना! तिकडे असा अनुभव कधीच आला नाही. तुलना करत नाही, गणित वेगळे असतील, पण व्यवहार चोख आहे.” अलीकडे एका मराठी मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेसाठी विचारणा झाली होती. “लीड रोल, माझ्या वयाला आणि दिसण्याला शोभेल अशी व्यक्तिरेखा… पण प्रोड्यूसरचे नाव कळल्यावर म्हटले, नको रे बाबा! काहीतरी कारण सांगून टाळले. आता स्वतःच्या पैशांचा पाठपुरावा करायला पूर्वीसारखी शक्ती किंवा पेशन्स उरलेला नाही,” असे तिने स्पष्ट केले. शेवटी तिने दोन मुद्दे मांडले: “काही खरे चांगले, व्यवहार चोख निर्माते आहेत, त्यांचे कौतुक व्हायला हवे. आणि दुसरे, सरळ, साधे, विश्वासार्ह निर्मात्यांसोबत काम करायला मिळायला हवे. शेवटी सुखाची झोप मिळवणे हीच इच्छा!” हेमांगी कवीच्या या सडेतोड पोस्टने मराठी मालिका विश्वातील पेमेंट डिले आणि अनियमिततेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी पोस्टला पाठिंबा देताना इंडस्ट्रीतील सुधारणेची गरज व्यक्त केली आहे. हेमांगीच्या या खऱ्या मनोगतामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.