Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या अस्थिर वातावरणात आणि नेतृत्वावरून सुरू असलेल्या चर्चेत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. पक्ष हा एक स्वतंत्र घटक असून, अंतर्गत निर्णय प्रक्रियेत बाहेरील हस्तक्षेपाची मुळीच आवश्यकता नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. हसन मुश्रीफ यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेचे समर्थन करताना विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, जेव्हा सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत, तेव्हा त्यांना व्हिलन ठरवणे पूर्णपणे चुकीचे आहे. पक्षाची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या नेत्यांवर अशा प्रकारचे आरोप करणे अनाठायी आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर या धक्क्यातून सावरत असतानाच, प्रशासकीय पोकळी निर्माण होऊ नये म्हणून सुनेत्रा वहिनींनी लवकरात लवकर पदभार स्वीकारावा, अशी संपूर्ण कुटुंबाची इच्छा होती.पवार कुटुंब हे पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते आहे. त्यामुळेच तिसऱ्या दिवसाचे विधी पूर्ण झाल्यानंतर, चौथ्या दिवशी हा शपथविधी सोहळा पार पडला, असेही त्यांनी स्पष्ट केले.