हैदराबाद: आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता तेलंगणा सरकार कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या पगारातून १० टक्के रक्कम कापून ती थेट त्यांच्या पीडित पालकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी जाहीर केला आहे. या निर्णयामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोमवारी स्पष्ट केले की, वृद्ध पालकांनी आपल्या मुलांविरुद्ध केलेल्या तक्रारींची प्रशासन गांभीर्याने दखल घेईल. पालकांच्या उदरनिर्वाहासाठी मुलाच्या पगारातून कपात केलेली ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल, याची खात्री सरकार करेल. याशिवाय, वरिष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी राज्य सरकार ‘प्रणाम’ नावाने डे-केअर सेंटर्सची साखळी उभी करणार असून, या विशेष योजनेसाठी ५० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पाऊले उचलताना मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांसाठीही अनेक मोठ्या घोषणा केल्या. दिव्यांगांना बॅटरीवर चालणाऱ्या ट्राय सायकल्स, व्हीलचेअर, लॅपटॉप, श्रवणयंत्रे आणि मोबाईल फोन यांसारखी आधुनिक उपकरणे मोफत वाटप करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच, नवविवाहित दिव्यांग जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून २ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याचे सरकारने आधीच जाहीर केले असून, शिक्षण आणि रोजगारात त्यांच्यासाठी विशेष कोटा निश्चित करण्यात आला आहे. राज्याच्या आगामी आरोग्य धोरणाबाबत बोलताना रेड्डी म्हणाले की, २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पीय प्रस्तावांमध्ये एक नवीन आरोग्य धोरण मांडले जाईल, ज्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे सुलभ होईल. यासोबतच राजकीय आणि सामाजिक समावेशकतेचे उदाहरण म्हणून आगामी निवडणुकांमध्ये सर्व महानगरपालिकांमध्ये तृतीयपंथीयांना ‘सह-सदस्य’ म्हणून नियुक्त केले जाईल. यामुळे तृतीयपंथीय समुदायाला त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मानवीय दृष्टिकोनातून समाजातील शेवटच्या घटकाला सक्षम करणे हेच सरकारच्या ध्येय असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग आणि वृद्धांना या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. तेलंगणा सरकारच्या या धाडसी पावलामुळे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एका नवीन प्रशासकीय संस्कृतीची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.