Gauri Garje Case | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे गर्जे यांनी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. अनंत गर्जे यांच्यासह सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळामुळेच गौरी यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप माहेरच्या व्यक्तींनी केला. त्यानंतर आज डॉ. गौरी पालवे यांचे पार्थिव अनंत गर्जे याच्या मूळ गावी मोहोज देवढे येथे नेण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. गौरी यांच्या माहेरच्या मंडळींनी पती अनंत गर्जे याच्या घरासमोर अंत्यसंस्काराची मागणी केली, पण गर्जे कुटुंबाने याला विरोध केला. यामुळे दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ. गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. यावेळी मुलीला अखेरचा निरोप देताना गौरी यांच्या वडिलांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थित सर्वच स्तब्ध झाले. Gauri Garje Case | उपस्थितांचे डोळे पाणावले डॉ. गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार सुरु असताना तिचे वडील धाय मोकलून रडले. तसेच पोलिसांसमोर रडतरडत त्यांनी आर्त विनवणी केली. ‘तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या. तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका. श्रीमंतीच्या भपक्यावर जाऊ नका’, हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. Gauri Garje Case | मध्यरात्री अनंत गर्जे अटकेत दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी वरळीच्या बीडीडी वसाहतीतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्य महिलेसोबतचे संबंध उघड झाल्याने अनंत आणि त्याचे कुटुंबीय गौरीला त्रास देत होते, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी अनंत गर्जे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर रविवारी रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती. अनंत गर्जे यांच्यासह त्याचा भाऊ आणि बहिणीवर डॉ. गौरी पालवे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Gauri Garje Case | अनंत गर्जे यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत होऊ शकते. दरम्यान, काही वेळापूर्वीच पोलिसांचे एक पथक अनंत गर्जे यांच्या वरळीतील घरी रवाना झाले आहे. या पथकात काही डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश आहे. याप्रकरणी आता आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Gauri Garje Case | हेही वाचा: सिंध प्रांताविषयी संरक्षणमंत्र्यांच्या त्या’ विधानाने पाकची झोप उडाली ; काश्मीरचा मुद्दा छेडत पुन्हा गरळ ओकली