Gadchiroli Naxal Encounter : छत्तीसगड सीमेलगतच्या भामरागड उपविभागातील अबुझमाड जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. परंतु, ही कारवाई करताना नक्षलवाद्यांशी लढतेवेळी सी-६० पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी यांना वीरमरण आले, तर अन्य एक जवान जखमी झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी नक्षलवाद्यांच्या ‘कंपनी क्रमांक १०’ आणि छत्तीसगडमधील एका दलमची हालचाल असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली होती. सी-६० च्या १४ पथकांनी रात्रीच जंगलात कूच केली होती. काल दिवसभर चाललेल्या या धुमश्चक्रीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले होते. गुरुवारी अतिरिक्त पथके आणि सीआरपीएफच्या तुकडीला पाचारण केल्यानंतर हा संघर्ष आणखी वाढला. दरम्यान, या मोहिमेत आज सकाळी आणखी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामध्ये एका पुरुष आणि एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. आतापर्यंत या चकमकीत एकूण ३ नक्षलवादी (२ पुरुष व १ महिला) ठार झाले असून, त्यांच्याकडून एक एके-४७ आणि एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे. अद्याप मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही. Gadchiroli Naxal Encounter : दुसरीकडे, नक्षलवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सी-६० पथकाचे ३८ वर्षीय जवान दीपक चिन्ना मडावी (रा. अहेरी, मूळ मांड्रा) हे गंभीर जखमी झाले होते. आज पहाटे त्यांना अबुझमाडच्या घनदाट जंगलातून हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून भामरागड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. याच मोहिमेदरम्यान जोगा मडावी हे जवानही गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. त्यांनाही हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना गडचिरोली येथे हलवण्यात येणार आहे. या भागात अद्यापही नक्षलवाद्यांचा वावर असण्याची शक्यता असल्याने शोधमोहीम सुरूच आहे. दुर्गम भाग आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत जवान ही मोहीम राबवत असून, सविस्तर तपशील शोधमोहीम पूर्ण झाल्यावरच समोर येईल, असे पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे. Gadchiroli Naxal Encounter :