पुण्यात भाजपकडून शिंदे गटाला 12 जागांची ऑफर आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबतयुती करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता शिंदे गटही पुण्यात भाजपची साथ सोडेल, अशी चिन्हं दिसत आहेत. पुणे महानगरपालिकेत एकूण 41 प्रभाग असून नगरसेवकांची संख्या 165 इतकी आहे. जागावाटपात भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अवघ्या 12 जागांची ऑफर देण्यात आली आहे. भाजपकडून जागावाटपात सन्मानजनक जागा सोडल्या जात नसल्याने शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय. शिवसेनेला पुण्यात भाजपकडून सन्मानजक जागांची अपेक्षा आहे. मात्र, भाजपकडून काहीच उत्तर आलं नाही तर शिवसेना योग्य निर्णय घेईल. एकनाथ शिंदे याबाबत अंतिम निर्णय घेतील, असेही गोऱ्हे यांनी सांगितले. ============================ खुशखबर! लाडक्या बहिणींना KYC साठी मुदतवाढ मिळणार? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी त्याआधी केवायसी करायची आहे. केवायसी करण्यासाठी अवघे ४ दिवस उरले आहेत. त्यामुळे अजूनही केवायसी केले नसेल तर लवकरच करावेत. लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी डेडलाइन वाढण्याची शक्यता आहे.याआधीही एकदा मुदत वाढवण्यात आली होती. सध्या महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ही मुदत वाढवली जाऊ शकते. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. ================= ठाकरे घराण्याचा नव्या पिढीच्या हाती प्रचाराची सूत्रं मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युती केली आहे. या युतीने दोन्ही भाऊ अनेक वर्षांनी एकत्र आलेत. दरम्यान, आता या निवडणुकीच्या प्रचाराची सूत्र आता नव्या पिढीच्या हाती देण्यात आलेत. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाकरे घराण्याची ही नवी पिढी आता एकत्र येऊन निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या किंवा परवा आदित्य आणि अमित ठाकरेंची बैठक होणार आहे. ज्यामध्ये प्रचाराचे सूत्र निश्चित केले जाईल. दोन्ही युवा नेत्यांच्या एकत्र येण्याने मुंबईतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ============= पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक! पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक पार पडली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांच्यात चर्चा झाली आहे. एक तास झालेल्या बैठकीत जागा वाटपावर बरीच घासाघीस झाली आहे. अजित पवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवारांच्या इच्छुकांनींही दावा केला आहे. या ठिकाणी नेमके कोणाचे उमेदवार द्यायचे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घ्यायचं का? यावर बरीच खलबते रंगली आहेत. दरम्यान, या बैठकीनंतर अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी नो कमेंट्स म्हणत थेट पुणे गाठलं आहे. आता पुण्यात हे दोघे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने संवाद साधणार आहेत, अशी माहिती अजित पवार गटाकडून बैठकीत उपस्थित असलेल्या अजित गव्हाणे यांनी दिली आहे. ================== हिंदू मतदारांनी काँग्रेस पक्षाला सोडलंय हिंदू मतदार काँग्रेस पक्षाला सोडून गेला आहे. नगरपालिका निवडणुकीत फक्त आदिवासी बहुल भागात काँग्रेसला यश आलंय. या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झालेले आहे. काँग्रेसच ओरबडण्याचे धोरण थांबत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत बसणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षाशी युती करण्याचे अधिकारी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत भाष्य केलंय. ================= पहाटे गुजरात हादरलं; कच्छ भागात भूकंपाचे धक्के गुजरात राज्यातील कच्छ परिसरात आज भूकंपाचे धक्का जाणवले. कच्छ आणि परिसरात झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र विभागाने दिलीय. भूकंपाचे धक्के कच्छ परिसरात जाणवले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भूकंपानंतर काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांना घाबरू नये, असं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान, भूकंपाच्या केंद्रबिंदूची अचूक माहिती आणि पुढील घडामोडींवर राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून निरीक्षण सुरू आहे. ===================== सोने सलग पाचव्या दिवशी महागले ; चांदीही चकाकली देशात सोन्याच्या भावात सलग चार दिवस वाढ झाल्यानंतर आजही सोने तेजीत आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३९,४१० रुपयांवर पोहोचला. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १३९,२६० रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट भाव प्रति औंस ४,५२५.९६ डॉलर आहे. या वर्षी आतापर्यंत सोन्यात ७३.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.आणखी वाढ अपेक्षित आहे. अनेक विश्लेषकांचा अंदाज आहे की पुढील वर्षी सोन्याचे भाव वाढतच राहतील. सोन्याप्रमाणेच आज चांदीचा भावहीवाढला आहे. चांदीचा भाव आज २,३४,१०० रुपये इतका झालाय.या वर्षी आतापर्यंत परदेशी बाजारात चांदीच्या किमती १५१ टक्के आणि देशांतर्गत बाजारात १५३ टक्के वाढल्या आहेत. ==================== डोनाल्ड ट्रम्प यांचा नायजेरियावर हल्ल्याचा आदेश अमेरिकन सैनिकांनी नायजेरियातील आयसिसच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत आयसिसच्या तळावर हल्ला केल्याची माहिती दिली. ऑक्टोबरमध्ये नायजेरियातील आयसिसच्या दहशतवाद्यांनी ख्रिश्चन लोकांची हत्या केली होती. त्यामुळे बदला घेण्यासाठी ट्रम्प यांनी एअर स्ट्राइक करण्याचे आदेश दिले. ईशान्य नायजेरियात असलेल्या आयसिस दहशतवाद्यांवर अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये विमानातून बॉम्ब हल्ला केल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमेरिकन सैन्याच्या आफ्रिका कमांडरनेही हवाई हल्ल्याची माहिती शेअर केली. हा हल्ला नायजेरियन सरकारच्या विनंतीवरून करण्यात आला आणि त्यात अनेक दहशतवादी मारले गेले, असे त्यांनी म्हटलेय. ================= रोहित भाऊ, वडापाव खाणार का? तब्बल ७ वर्षांनंतर रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफी खेळला. या सामन्यात त्याने तुफान फलंदाजी करत १५१ रन्सची खेळी केली. रोहित शर्माचं फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. मैदान असो किंवा मैदानाबाहेर रोहित शर्माचं मस्करीचा अंदाज हा सुरुच असतो. मुंबई विरूद्ध सिक्कीमच्या सामन्यात देखील रोहित शर्माचा हा अंदाज पाहायला मिळाला. यावेळी एका चाहत्याने रोहितला एक प्रश्न विचारला आणि रोहितने अगदी खास पद्धतीने त्याचं उत्तर दिलंय. रोहित शर्मा बाऊंड्री लाईनवर फिल्डींग करत होता. त्यावेळी सामना पाहायला आलेल्या चाहत्याने विचारलं की, रोहित भाई, वडापाव खाणार का? महत्त्वाचं म्हणजे रोहित शर्माने त्याला प्रत्युत्तरही दिलं. रोहितने हात करत नाही असं म्हटलं. क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून लोकांनी तो खूप शेअर केला आहे. ================== चाहत्यांच्या प्रश्नावर प्राजक्ताचं मिश्किल उत्तर मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने हल्लीच चाहत्यांच्या काही खास प्रश्नांची उत्तर दिली आहेत. यावेळी काही चाहत्यांनी तिला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले. त्यावर तिने मिश्किलपणे उत्तर दिलंय. सोशल मीडियावर तिने चालवलेल्या प्रश्नोत्तर सत्रात एका चाहत्याने तिला थेट “तुम्ही कधी लग्न करणार?” असा प्रश्न विचारला. यावर प्राजक्ताने त्वरित उत्तर देण्याऐवजी चाहत्याला प्रत्युत्तर म्हणून “तुम्हाला खरंच वाटतं… की मी लग्न करावं?” असा प्रश्नच विचारला, त्यामुळे तिने हा प्रश्न चांगलाचं फिरवला. आगामी काळात प्राजक्त ‘देवखेळ’ नावाच्या प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे. यामध्ये ती अजून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.