राज्यात 262 नगरपरिषद, नगरपंचायतीत आज मतदान राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात झाली. आज सांयकाळी ५:३० पर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. या निवडणुकांची मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या होणार आहे. तब्बल आठ ते दहा वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. निमशहरी भागातील मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने मतदान यंत्रात बंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. =================== मालवणमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि भाजप नेत्यांमधील संघर्षामुळे चर्चेत असलेल्या मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वीची रात्रही वादग्रस्त ठरली. मालवणध्ये सोमवारी मध्यरात्री नाकाबंदीत एक कार सापडली. या कारमध्ये दीड लाखांची रोकड सापडली. ही कार भाजप (BJP) स्थानिक पदाधिकाऱ्याची होती. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि निलेश राणे यांनी यानंतर भाजपकडून पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप केला. त्यामुळे काल मध्यरात्री वातावरण प्रचंड तापले होते. यापूर्वी देखील निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धड टाकून त्यांच्या घरातून पैशांची बॅग सर्वांसमोर आणली होती . ================= माझ्यावर टाकलेली धाड कटकारस्थानातून निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना असताना मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयासह चार ठिकाणी धाड पडली. ही कारवाई खेदजनक आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या कटकारस्थानातून ही धाड टाकण्यात आली, असा आरोप शहाजी पाटील यांनी केला.पाटील म्हणाले, माझ्याच पक्षाचे सरकार असताना मला बदनाम केले जात आहे, हे बरोबर नाही. मी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सविस्तरपणे बोलणार आहे. मी लढणारा कार्यकर्ता आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शहाजी बापू पाटील भावुक झाले ================= सोलापूरात दहा पैकी सात ठिकाणी भाजप-शिवसेनेत लढत सोलापूर जिल्ह्यात अकरा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीची निवडणूक आज होत असून यातील अनगर आणि मंगळवेढा या दोन ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. दरम्यान, आज मतदान होत असलेल्या यातील दहा नगरपालिकांमध्ये सात ठिकाणी भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी लढत होत असल्याने दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदा प्रथमच सर्व नगरपालिकेत कमळ चिन्हावर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निवडणूक रिंगणात उतरविल्याने भाजपचे चिन्ह वर पोहोचवण्यात त्यांना यश आले आहे. ======================= चंद्रपूरमध्ये पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ व्हायरल राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी आज राज्यात मतदान होत आहे. त्याआधी चंद्रपूरमध्ये पैसे वाटप केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ५०० रूपयांच्या नोटा दिल्या जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसतेय. भाजपच्या उमेदवाराकडून पैशाचे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून कऱण्यात येत आहे. चंद्रपूरमधील राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ चे भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आहे. त्यांचे वडील आणि भाजप नेते पांडूरंग चिल्लावार हे निवडणूकीत ५०० रूपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचा विडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान , काँग्रेसकडून आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करणार असल्याचं म्हटलंय. ====================== आता प्रत्येक मोबाईलमध्ये ‘संचार सारथी’ देशातील मोबाइल सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी, दूरसंचार विभागानं एक नवीन निर्देश जारी केलाय. या निर्देशानुसार, भारतात उत्पादित होणाऱ्या किंवा परदेशातून आयात केलेल्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये आता संचार साथी अॅप प्री-इंस्टॉल केलेले असेल. सर्व मोबाइल उत्पादक आणि आयातदारांना हा आदेश त्वरित लागू करण्याचे आदेश देण्यात आलेत. संचार साथी अॅप मोबाइल वापरकर्त्यांना सुरक्षा प्रदान करते. जर फोन हरवला किंवा चोरीला गेला तर काही मिनिटांत त्याची तक्रार करणं आणि ब्लॉक करणं शक्य आहे. याव्यतिरिक्त, अॅप बनावट लिंक्स, स्पॅम कॉल्स, संशयास्पद संदेश आणि मोबाइल फोनवरील चालू कनेक्शनवर लक्ष ठेवण्यास मदत करतं. ==================== भारताकडून पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र खुलं भारताने पाकिस्तानला त्यांच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला मानवतावादी मदत आणि साहित्य पोहोचवण्यासाठी ही परवानगी दिली असल्याचं सरकारनं म्हटलंय. काल दुपारी १ वाजता श्रीलंकेला प्रवास करण्यासाठी पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी मागितली. भारत सरकारने अवघ्या चार तासांत परवानगी दिली आणि सुमारे ५:३० वाजता प्रतिसाद दिला. अधिकृत उत्तर पाकिस्तानला पाठवण्यात आलं.ऑपरेशन सिंदूरपासून पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे, परंतु भारताने मानवता दाखवत श्रीलंकेला मदत करण्याच्या उदात्त कार्यात योगदान दिलंय. ========================== भविष्यात पैसा ‘बिनकामाचा’ ठरणार तुमच्या खिशातला पैसा नोटा आणि बँक कार्ड्स भविष्यात कदाचित काहीही कामाचे राहणार नाहीत अशी धक्कादायक भविष्यवाणी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कने केली आहे. एआय आणि रोबोटिक्स झपाट्याने विकसित झाल्यास ‘पैसा’ हे फक्त औपचारिक साधन राहील, असे मस्कने एका पॉडकास्टमध्ये सांगितले.एलॉन मस्कच्या मते, जेव्हा मशीनच सर्व गरजा विनामूल्य किंवा अतिशय स्वस्तात पूर्ण करू लागतील, तेव्हा सध्याची चलनव्यवस्था आणि पैशाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात कमी होईल. इलॉन मस्क नुकतंच ‘पीपल बाय WTF’ या निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना त्याच मत व्यक्त केलं. भविष्यात पैसा कसा असेल या प्रश्नावर, AI आणि रोबोटिक्स इतक्या वेगाने प्रगत होतील की उत्पादनासाठी मानवशक्ती किंवा मोठ्या संसाधनांची गरजच उरणार नाही. वस्तूंची मुबलकता वाढली तर ‘पैसा’ या संकल्पनेचीच किंमत उरेलच असे नाही. असं त्यांनी म्हटलं. ================== हार्दिक पांड्याला बीसीसीआयचा ग्रीन सिग्नल दक्षिण आफ्रिका विरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेदरम्यान टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा पूर्ण फिट झाला असून मैदानात धमाका करण्यास तयार आहेत. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हार्दिकने आपला बॉलिंग फिटनेस टेस्ट यशस्वीरीत्या पार केला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत हार्दिकची उपस्थिती जवळपास निश्चित झाली आहे. त्याआधी तो सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतही बॅट-बॉल दोन्हीने कमाल करताना दिसणार आहे. ================ सूरज चव्हणच्या लग्नानंतर बहिणीची तब्येत बिघडली ‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता सूरज चव्हाणचे थाटामाटात लग्न पार पडले. या लग्नात सूरज चव्हाणची लाडकी बहीण जान्हवी किल्लेकर हळदीपासून ते लग्नापर्यंत प्रत्येक समारंभात सूरजच्या सोबत होती. ज्यामुळे सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक झाले.मात्र आता सूरज चव्हाणच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकरची तब्येत अचानक बिघडली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जान्हवीने सोशल मीडियावर पोस्ट करून यासंबंधित माहिती दिलीय. तिच्यावर मुंबईतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने रुग्णायलातील फोटो शेअर केले. पोस्टला जान्हवीने ‘नजर इज रिअल’ असं कॅप्शन दिलंय. दरम्यान,तिच्या चाहत्यांनी तिला लवकर बरं शुभेच्छा दिल्यात