पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच आज पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालंय. ते 82 वर्षांचे होते. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता.इथल्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळे सुरेश कलमाडी अनेक वर्षे पुण्याचे खासदार राहिले. एक मोठा काळ कलमाडी यांची पुण्याच्या राजकारणावर पकड राहिली होती. गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते. सुरेश कलमाडी भारतीय वायुसेनेचे माजी वैमानिक होते आणि नंतर राजकारणात सक्रिय झाले. सुरेश कलमाडी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि 2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन समितीचे अध्यक्ष होते. 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता, ज्यामुळे त्यांना अटकही झाली होती, अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर, एप्रिल 2025 मध्ये ईडीने या प्रकरणी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र, त्यानंतर सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात कमबॅक करु शकले नाहीत. “आम्हाला हिशोब विचारणाऱ्यांनी आधी आरशात बघावं!” जे लोक आम्हाला कामाचा हिशोब विचारत आहेत, त्यांनी एकदा आरसा पाहावा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. पुण्यातील भाजपा-रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पुण्याच्या सर्वांगीण विकासाचा विडा उचलल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. तसेच येत्या पाच वर्षांत पुण्याचा चेहरामोहरा बदलला जाईल. शहराच्या विकासासाठी आगामी काळात सुमारे ८० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबवण्यात येतील. पुणे हे राज्याचे आर्थिक इंजिन असल्याचं सांगत फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांतील कामांचा पाढा वाचला. भाजपसह सर्वच पक्षात ‘अंतर्गत वॉर’! महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षात उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस होती. उमेदवारी मिळाली नाही तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत नाराजी जाहीर केली. त्यानंतर पक्षाकडून या नाराजांना स्विकृत सदस्य, पक्षीय समित्या तसेच वेगवेगळया शासकीय समित्यांची आश्वासने देत अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले आहे. मात्र, त्यानंतर हे नाराज पक्ष उमेदवारच्या प्रचारातून गायब आहेत. उमेदवारीसाठी पात्र असताना डावले गेल्याने या इच्छुकांना भेटण्यास पक्षाचे आमदार तसेच नेते भेटत असले तरी हे नाराज प्रचारात उतरण्यास तयार नाहीत. त्यामुळे नवीन उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांना प्रचाराचा अनुभव नसल्याने त्यांची चांगलीच कोंडी होतीय. बंडखोरांवर पक्षाची शिस्तभंगाची कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाने प्रभाग १६ आणि प्रभाग २७ याठिकाणी बंडखोर उमेदवारांवर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले आहे. प्रभाग १६ मधून भाग्यश्री जाधव आणि अविनाश काळे यांना उमेदवारी दिली होती; परंतु दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक होऊन दोन्ही राष्ट्रवादीने एकमतानं वैशाली बनकर , वर्षा पवार , कमलेश कापरे आणि योगेश ससाणे यांना उमेदवारी दिलीय. हे चौघेही घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) ने जाधव आणि काळे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले. मात्र, त्यांनी पक्षाचे ऐकले नाही. त्यामुळे त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलीय. मेट्रोच्या विक्रमी प्रतिसादानंतर मोहोळ यांचा विरोधकांवर प्रहार “सरलेल्या वर्षात तब्बल साडेसहा कोटी पुणेकरांनी मेट्रोने प्रवास करून पुण्यात मेट्रोची काय गरज, असा प्रश्न विचारणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना चपराक दिली आहे,”असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो हा मुद्दा भाजपाने पुढे केला आहे. मेट्रोने जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे भाजपाच्या प्रचारास बळ मिळाल्याचे दिसते आहे. मार्च २०२२ मध्ये पहिली मेट्रो पुण्यातून धावली. तेव्हापासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत दरवर्षी टप्प्या-टप्प्याने मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. उद्घाटनापासून डिसेंबर २०२५ पर्यंत जवळपास साडेदहा कोटी पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे. २०२५ मध्ये पुणे मेट्रोने विक्रमी वाढ नोंदवली. सरत्या वर्षात ६.७ कोटींपेक्षा अधिक प्रवाशांनी मेट्रोच्या आरामदायी, वेगवान, वातानुकूलित आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेतला. यातून पुणे मेट्रोला १०७.६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. एबी फॉर्म गहाळ करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याची बदली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला चिन्ह वाटपात राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह द्यावे लागले. या प्रकरणात एबी फॉर्म गहाळ करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची बदली करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या प्रभाग क्र. १६ ब जागेवरील उमेदवार जयश्री भोंडवे या उमेदवाराचा एबी फॉर्म पाटील यांच्याकडून गहाळ झाला. यात स्वतःची चूक असताना ही पाटील यांनी छाननीवेळी त्यांना अपक्ष उमेदवार ठरवले. या विरोधात संबधित उमेदवाराने उच्च न्यायालयात धाव घेतली.सबळ पुराव्यानंतर जयश्री भोंडवे यांना पक्षाचे अधिकृत घड्याळ चिन्ह दिल्याचं पालिका आयुक्तांनी जाहीर केलं. मात्र हा घोळ ज्यांच्यामुळे झाला. ते निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची आता बदली करण्यात आलीय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला अखेर स्थगिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला आता मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय. निवडणूक अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिलेत. दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालय याबाबत सविस्तर आदेश देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांसह सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे यांना कोर्टाने मोठा झटका दिल्याच बोललं जातय. या प्रकरणी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी निवडणुकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून पुणे येथील सर परशुरामभाऊ कॉलेजने देखील स्वतंत्र याचिका दाखल करुन निवडणुकीला आव्हान दिलय.परिणामी, निवडणुकीसाठी नव्याने समावेश केलेल्या मतदारांवर याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच निवडणूक नियमानुसार होत नसल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलाय. संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईच्या प्रभाग क्रमांक 194 मधून उमेदवारी न मिळाल्यानं संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरलीय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा वाटपात संतोष धुरी इच्छुक असलेला वॉर्ड क्रमांक 194 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेलाय. यामुळं नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता आज संतोष धुरी भाजप प्रवेश करणार आहेत. ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संतोष धुरी हे संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. त्यांच्याकडे वरळीचं विभागध्यक्ष हे पद होतं. संतोष धुरी हे मनसेमधून इच्छुक उमेदवार होते. मात्र आता त्यांनी भाजपची वाट धरलीय. “फटाके फोडणारे देशद्रोही” -मनेका गांधी दिल्लीला गेल्या काही महिन्यांपासून हवा प्रदूषणने उंची गाठलीय. भाजप नेत्या मनेका गांधी यांनी याच दिल्लीच्या प्रदूषणावर भाष्य केले. मनेका गांधी यांनी, “कोणत्याही कारणासाठी फटाके जाळणारे देशद्रोही आहेत. माझ्याकडे याबद्दल बोलण्यासाठी दुसरे शब्द नाहीत… असं म्हणत त्यांनी टीका केलीय. दिवाळी, दसरा, लग्न, नवीन वर्ष, क्रिकेट सामने किंवा इतर कोणत्याही दिवशी लोक इतके पैसे खर्च करून फटाके फोडतात परिणामी, आपण श्वासही घेऊ शकत नाही.” असं म्हणत गांधी यांनी या समस्येवर टिपण्णी केलीय जपानमध्ये ६.२ तीव्रतेचा भूकंप पश्चिम जपानमध्ये आज सकाळी ६.२ तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर येतीय. जपान हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र शिमाने प्रीफेक्चरच्या पूर्वेकडील भागात होते. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. जपान हवामान संस्थेने सांगितले की भूकंपानंतर लगेचच त्सुनामीचा इशारा देण्यात आला नाही. अधिकाऱ्यांनी लोकांना अफवांकडे दुर्लक्ष करून अधिकृत माहितीवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलंय.