Pune-PCMC Election Result 2026 | राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी आज निकाल जाहीर होत असून यात भाजपने सरशी घेतल्याचे दिसत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी शरद पवार आणि अजित पवार ह्या दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली होती. मात्र दोन्ही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये काटे की टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले होते. इतकेच काय तर अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. मात्र याचा फारसा कोणताही फरक झालेला पाहायला मिळाले नाही. समोर आलेल्या निकालानुसार, १६५ नगरसेवक असलेल्या पुणे महानगरपालिकेत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुण्यात एकत्र येऊनही घड्याळ आणि तुतारीला मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्येही भाजपच वरचढ ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. १२८ नगरसेवक असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. Pune-PCMC Election Result 2026 | मोफत पीएमपी आणि मेट्रो बससेवासह घोषणांचा पाऊस पुण्यातील प्रचारादरम्यान भाजपने 125 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. मेट्रो, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी रस्ते, विकासकामांचा मुद्दा भाजपने पुढे केला. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसने थेट सामान्य पुणेकरांसाठी मोफत पीएमपी आणि मेट्रो बससेवा, तसेच छोट्या घरांना मिळकतकर माफ या घोषणांनी निवडणुकीचं वातावरणच बदलून टाकल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. पण पुणेकरांनी फुकटचा प्रवास नाकारत भाजपला आपली पसंती दर्शवली. येथे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानेही आपली ताकद लावली होती. Pune-PCMC Election Result 2026 | दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना सुनावले होते. फडणविसांनी देखील काही जणांना कंठ फुटल्याचा टोला फडणवीस यांनी अजित पवार यांना उद्देशून लगावला होता. त्यावर नऊ वर्षाने निवडणूक जाहीर झाल्याने कंठ फुटल्याचे प्रत्युत्तर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजपमध्ये वर्चस्व वादाचा मुद्दा चांगलाच गाजला. अखेर दोन्ही ठिकाणी अजित पवारांना धक्का देत भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.