Kamran Akmal Slams Pakistan Cricket : बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. या पराभवानंतर माजी खेळाडू कामरान अकमलने आक्रमक पवित्रा घेत पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी आणि खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नेदरलँड्सचा उल्लेख करत उडवली खिल्ली – अकमल एका यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला की, “पाकिस्तानच्या क्रिकेटचा स्तर इतका खालावला आहे की, आता नेदरलँड्सचा संघही विचार करत असेल की यांच्यासोबत आमची मालिका व्हावी. नेदरलँड्सला वाटत असेल की जर आम्ही पाकिस्तानला हरवलं, तर आम्हाला ‘कसोटी खेळणाऱ्या देशाचा’ दर्जा सहज मिळेल. तुम्ही क्रिकेटची ही अवस्था करून ठेवली आहे आणि कोणालाही या पराभवाचे काहीच वाटत नाहीये.” ट्रॉफी चोरीचा ‘तो’ टोमणा – कामरान अकमलची पीसीबीच्या अध्यक्षांवर घणाघाती टीका अकमलने पीसीबी अध्यक्षांना थेट लक्ष्य करत विचारले की, “जर तुम्ही सामने जिंकणार नसाल, तर काय आयसीसी ट्रॉफी चोरी करून आणायची आहे का? ती मैदानात खेळून जिंकायची असते.” विशेष म्हणजे, मोहसीन नक्वी यांच्यावर आधीच आशिया चषक २०२५ ची ट्रॉफी विजेत्या भारताला न सोपवल्याचे आरोप आहे, ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ‘ट्रॉफी चोर’ म्हणून ट्रोल केले जाते. अकमलने याच मुद्द्यावरून नक्वींवर निशाणा साधला आहे. हेही वाचा – Sanju Samson Hug : नमन पुरस्कार सोहळ्यातील संजू सॅमसन अन् केएल राहुलच्या ‘त्या’ कृतीने जिंकली सर्वांची मन, पाहा VIDEO रणनीतीवरही उपस्थित केले प्रश्न – तिसऱ्या वनडेमधील चुकांवर बोट ठेवत अकमल म्हणाला की, “परिस्थिती चांगली असतानाही तुम्ही प्रथम फलंदाजी का केली नाही? बोर्डावर मोठी धावसंख्या उभारण्याऐवजी तुम्ही केवळ प्रयोग करत राहिलात. बांगलादेशचे ३५० धावांचे लक्ष्य होते, ते तर लिटन दास संथ खेळला म्हणून २९० पर्यंत मर्यादित राहिले. अशा लहान संघांकडून तुम्ही हरणार असाल, तर पाकिस्तान क्रिकेटचे भविष्य अंधारात आहे.”