Devendra Fadnavis | भाजपने अकोट नगरपरिषदेत बहुमतासाठी चक्क एमआयएम पक्षासोबत युती केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. भाजपने एमआयएमसह इतर सर्व प्रमुख पक्षांना सोबत घेत अकोट विकास मंच स्थापन केला आहे. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तर दुसरीकडे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेसची युती झाली. यावरुन भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होण्यास सुरुवात झाली. यानंतर आता एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवरुन स्थानिक नेतेमंडळींवर संताप व्यक्त केला आहे. “काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्यांनी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल,” असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. Devendra Fadnavis | अकोट नगरपालिकेत अनोखी युती अकोट नगरपालिकेत ३५ पैकी ३३ जागांवर निवडणुका पार पडल्या. यात भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या असून, भाजपच्या माया धुळे यांनी नगराध्यक्षपदही पटकावले आहे. मात्र, सभागृहात स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यानंतर भाजपने सर्वसमावेशक अकोट विकास मंच आघाडी तयार केली आहे. यात भाजपसोबत एमआयएमच्या ५, प्रहारच्या ३, ठाकरे गटाच्या २ शिंदे गटाच्या १, अजित पवार गटाच्या २ शरद पवार गटाच्या २ सदस्यांचा समावेश आहे. तर काँग्रेसचे ६ आणि वंचित बहुजन आघाडीचे २ सदस्य आता विरोधी बाकावर बसणार आहेत. या सर्व पक्षांना एकत्र आणल्यामुळे सत्ताधारी गटाची सदस्य संख्या आता २५ वर पोहोचली आहे. या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, भाजपचे आमदार रवी ठाकूर यांची या आघाडीचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेला दूर लोटून काँग्रेसला घेतलं सोबत एकीकडे काँग्रेसमुक्त भारत करण्याचे भाजपचे वरिष्ठ नेते देशपातळीवर सांगतात.त र दुसरीकडे नगरपरिषदेत सत्तेसाठी काहीही करण्याची भाजप नेत्यांची तयारी असल्याचं दिसतंय. भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी विजयी झाल्या, मात्र अंबरनाथमध्ये भाजप नगरपरिषदेत बहुमत नव्हतं. त्यानंतर भाजपचे 16, काँग्रेसचे 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 अशा 32 नगरसेवकांची मोट बांधत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला दूर केलं. याद्वारे काँग्रेसला सोबत घेऊन भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. हेही वाचा: संंजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट! तीन नेत्यांची नाव घेत केला ‘हा’ मोठा दावा म्हणाले…