जळगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत कलगीतुरा शिगेला पोहोचला असून, भाजप नेते आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका स्फोटक विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते नीलेश राणे यांनी भाजपवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप केल्यानंतर, त्याबाबत विचारले असता, चव्हाण यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला. आज (२७ नोव्हेंबर) जळगाव दौऱ्यावर असलेल्या चव्हाणांना पत्रकारांनी नीलेश राणेंच्या आरोपांबद्दल विचारले. त्यावेळी, “नीलेश राणे यांचे आरोप खोटे आहेत. पण, मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यामुळे मी यावर आताच काही भाष्य करणार नाही. मी नंतर यावर सविस्तर बोलेन,” असे सूचक विधान त्यांनी केले. चव्हाणांच्या या वक्तव्याने २ तारखेनंतर महायुतीत मोठा राजकीय भूकंप होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. नीलेश राणे यांनी थेट चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केल्याने कोकणातील राजकारण तापले आहे. स्थानिक पातळीवर तिकीट वाटपावरून पक्षांतरे सुरू असताना, शिंदे गटाच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याच्या कारणावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याचीही चर्चा आहे. अशा तणावाच्या वातावरणात, रवींद्र चव्हाण यांनी ‘युती टिकवण्याबाबत’ दिलेली ही ‘डेडलाईन’ महायुतीच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. वरिष्ठ नेत्यांमध्येही ‘अबोला’ असल्याचे चित्र असल्याने निवडणुकीनंतर युतीचे स्वरूप काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.