Bhosari Land Scam Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. भोसरी जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. यामुळे खडसे कुटुंबियांविरोधातील 13 तारखेला होणारी आरोप निश्चिती टळली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून 24 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात 2018 साली झालेल्या सुधारणेला मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर आव्हान देण्यात आल्याची नोंद घेत उच्च न्यायालयाकडून खडसेंविरोधातील सत्र न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेवर तूर्तास स्थगिती देण्यात आली. 24 तारखेपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर तातडीने प्रकरण मेंशन करुन घेण्याचे निर्देश न्या.अश्विन भोबे यांनी दिले आहेत. दरम्यान, भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलम 13 (1 ड) अंतर्गत खडसेंवर भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कायद्यात झालेल्या सुधारणेनंतर या कलमात बदल झाला आहे. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात झालेल्या सुधारणेच्या पूर्वलक्षी परिणामाचा मुद्दा अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचा युक्तिवादही खडसेंच्यावतीने अॅड. करणसिंह राजपूत यांच्याकडून करण्यात आला.