भारत आणि श्रीलंका संयुक्त यजमान असलेली टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. नेहमीप्रमाणे कोणत्याही स्पर्धेत ज्याप्रमाणे वादविवाद होतात, त्याप्रमाणे या स्पर्धेलाही वादविवादाचे आणि राजकारणाचे गालबोट लागले आहे. त्यालाही नेहमीप्रमाणे पाकिस्तानच जबाबदार आहे. या स्पर्धेमध्ये 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जो सामना होणार होता त्या सामन्यावर बहिष्कार घालून पाकिस्तानने क्रिकेटच्या मैदानावर राजकारण आणले आहे. खरे तर पाकिस्तानसारख्या संघाला या स्पर्धेमध्ये सहभाग घेता यावा म्हणून ही स्पर्धा संयुक्तपणे भरवण्यात आली होती. अन्यथा ही स्पर्धा फक्त भारताच्या मैदानांवरच खेळवली जाणार होती. पण पाकिस्तानची सोय व्हावी म्हणून श्रीलंकेला सह यजमान करण्यात आले आहे. असे असतानासुद्धा बांगलादेशला पाठिंबा देण्याच्या नादात पाकिस्तानने क्रिकेटच्या मैदानावर राजकारण आणून आपल्याच पायावर कुर्हाड मारली आहे. सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध चांगले नाहीत. या पार्श्वभूमीवर आयपीएलमधील लिलावामध्ये एका बांगलादेशी खेळाडूला सहभागी करून घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला विरोध दर्शवला होता. या खेळाडूला त्या लिलावातून आणि आयपीएलमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्याला प्रतिसाद किंवा प्रत्युत्तर म्हणून बांगलादेश संघाने आम्ही भारतात टी20 विश्वचषक स्पर्धा खेळायला जाणार नाही अशी घोषणा केली. सुरक्षेच्या कारणावरून आम्ही भारताचा दौरा करणार नाही, आमचे सामने इतरत्र नियोजित करावेत अशी बांगलादेशची मागणी होती. पण ऐनवेळी ते शक्य नसल्याने आयसीसीने बांगलादेशला या स्पर्धेतूनच बाजूला काढले आणि त्यांच्या जागी दुसर्या देशाला संधी दिली. खरेतर हा विषय येथेच संपत असताना पाकिस्तानने विनाकारण त्यामध्ये नाक खुपसले आणि बांगलादेशला पाठिंबा देण्याच्या नादात आम्हीसुद्धा भारताविरुद्धचा 15 फेब्रुवारीचा सामना खेळणार नाही अशी घोषणा केली. पाकिस्तानच्या या घोषणेला कोणताही ठोस पाया नव्हता आणि कोणतेही तत्त्व नव्हते. कारण हा सामना न खेळण्याची घोषणा होत असतानाच अंडर19 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक सामना झाला, ज्यामध्ये भारतीय युवकांनी पाकिस्तानवर मात केली. एवढेच नाही तर 15 फेब्रुवारीलाच भारत आणि पाकिस्तान यांच्या महिलांमध्येसुद्धा एक सामना होणार आहे. जर पाकिस्तानला भारतासोबत क्रिकेटविषयक संबंध ठेवायचे नसतील तर ते सर्वच पातळीवर ठेवायला नकोत. पण त्यांनी सोयीस्करपणे फक्त टी20 विश्वचषक स्पर्धेतील सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा पाकिस्तानलाच अनेक अर्थाने फटका बसणार आहे. एक तर त्यांना दोन गुण गमवावे लागणार आहेतच. आयसीसी आणि प्रायोजकांकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर आर्थिक दंडही लावला जाऊ शकतो. कोणताही देश जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेतो तेव्हा त्यांचा ब्रॉड कास्टर्स, प्रायोजक आणि सहप्रयोजकांसोबतही करार असतो. कोणतेही कारण न देता संघांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होणे अपेक्षित असते. एखादा संघ न पटणार्या एखाद्या कारणासाठी या स्पर्धेत सहभागी झाला नाही तर तो करार भंग मानला जातो आणि सर्व प्रायोजक अशा संघाविरोधात आर्थिक नुकसानभरपाईची मागणी करू शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच सर्वांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारा सामना असतो. जाहिरातदार ब्रॉडकास्ट कंपन्या सर्वांसाठीच हा सामना म्हणजे कमाईची मोठी संधी असते. पण पाकिस्तानने ऐनवेळी असा निर्णय घेतल्यामुळे सर्वांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नाला मुकावे लागणार असल्याने त्याची भरपाई ते पाकिस्तानकडूनच वसूल करणार हे उघड आहे. या व्यतिरिक्त आयसीसीचा सदस्य असलेल्या पाकिस्तानने शिस्तभंग केल्याचे कारण देऊन आयसीसीकडूनसुद्धा पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले जाऊ शकतात, ज्यामध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यावर बंदी असे काही कठोर उपाय असू शकतात. पाकिस्तानला या सर्व परिस्थितीची कल्पना नाही असे नाही. पण केवळ लोकप्रिय घोषणा करण्याच्या नादात पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारताविरुद्धचा सामना खेळू नये अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. पूर्वीच्या काही विश्वचषक स्पर्धांमध्ये जरी अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्या तरी एखाद्या देशाने दुसर्या देशाविरुद्ध सामना न खेळण्यामागे एखादे संयुक्तिक किंवा योग्य कारण असायचे. पाकिस्तानमधील माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटतज्ज्ञसुद्धा पाकिस्तानचा हा निर्णय त्यांना अनेक वर्षे मागे घेऊन जाणारा ठरेल असे सांगत आहेत. पण पाकिस्तानच्या विचित्र राजकारणावर त्याचा कोणता फरक पडेल असे सध्या तरी दिसत नाही. ज्या प्रकारे भारताने आशियाई क्रिकेट चषक स्पर्धा जिंकूनसुद्धा अद्याप तो चषक पाकिस्तानने स्वतःच्याच ताब्यात ठेवला आहे, त्याच प्रकारे या टी20 विश्वचषक स्पर्धेमध्ये सुद्धा विचित्र वागणुकीच्या निमित्ताने पाकिस्तान चर्चेत राहणार हे उघड आहे. पाकिस्तानने या निर्णयाने विजेतेपद मिळवण्याची शक्यता तर कमी केली आहेच शिवाय भविष्यातील क्रिकेट विकासालाही खो घातला आहे. या व्यतिरिक्त आर्थिक नुकसानभरपाईच्या निमित्ताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कंबरडेही मोडले जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेटचे आणि पाकिस्तानच्या सत्ताधार्यांचे सल्लागार जर चाणाक्ष असतील तर अजूनही या स्पर्धेत भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय मागे घेऊन 15 फेब्रुवारीला मैदानावर उतरून क्रिकेट संघाशी सामना करणे हेच जास्त समजूतदारपणाचे ठरणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर अशा प्रकारचे राजकारण आणून आपले भले होणार नाही, हे कोणीतरी पाकिस्तानला समजावून सांगण्याची गरज आहे.