– राजेंद्र चोपडे खरी शिवसेना कोणाची, याचा सर्वोच्च न्यायालयातील निकाल लागेल की नाही हे सांगता येणार नाही. मात्र मुंबईकरांनी आपला कौल उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला आहे. पालिकेच्या सत्तेपासून ठाकरे दूर राहिले असले, तरी या पराभवातही खरी शिवसेना कोणती हा विजयाचा निकाल दडलेला आहे. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेचा निकाल लागला तरी त्याचे कवित्व अजून बाकी आहे. मुंबई पालिकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, याचे कारण म्हणजे देशाची आर्थिक राजधानी म्हणून असलेले जागतिक महत्त्व आणि या महानगराचा बहुभाषिक चेहरा. निकालानंतर मुंबईवर दीर्घकाळ वर्चस्व राखून असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्ता राखण्यात अपयश आल्याने बहुतेक प्रसार माध्यमांत शिवसेनेची जबर पीछेहाट आणि भारतीय जनता पक्षाची मुसंडी अशा आशयाचे मथळे छापून आले. पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर युती करून ही निवडणूक लढवली होती. दोन्ही पक्ष राज्यात सत्तेवर असल्याने आणि केंद्र सरकारचे सर्व प्रकारचे पाठबळ असतानाही त्यांना महापालिकेत काठावरचे बहुमत मिळाले आहे. दुसरी गोष्ट 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाच्या संख्याबळात नाममात्र वाढ झाली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपच्या बरोबरीने 90 जागा लढवून 29च जागा मिळवल्या आहेत. पूर्वीच्या शिवसेनेतील जवळ जवळ 60 नगरसेवक गळाला लावूनही त्यांची कामगिरी यथातथाच. शिंदेंनी घराणेशाहीत दिलेले उमेदवार ठाकरे यांच्या उमेदवारांकडून पराभूत झाले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे यांच्या नगरसेवकांना मिळालेल्या मतांमध्ये भाजपच्या मतांचाही समावेश आहे. दुसर्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमवेत अत्यंत विपरित स्थितीत निवडणूक लढवली. 2022 मध्ये फूट पडल्यानंतर सातत्याने भाजप-शिंदे शिवसेनेकडून राजकीय कोंडी होत असतानाही ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपली शिवसेना अजून संपलेली नाही हे त्यांनी दाखवून दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा असलेली शिवसेना डोळ्यादेखत चोरल्यानंतर निवडणूक आयोगाने दबावाखाली पक्ष, चिन्हदेखील शिंदे यांना बहाल केले. खरी शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची, याची लढाई सर्वोच्च न्यायालयात अजूनही चालूच आहे. त्याचा निकाल केव्हा लागेल हे कोणीही सांगू शकणार नाही. अशा स्थितीत उद्धव ठाकरे लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीला सामोरे गेले. ठाकरेंची खरी परीक्षा होती ती मुंबई महापालिका निवडणुकीत. मुंबईतील मराठी माणसांची अस्मिता निगडीत असलेली बाळासाहेबांची शिवसेना कोणाकडे आहे याचे उत्तर, या निवडणुकीत मिळणार होते. मराठीबहुल मध्य आणि दक्षिण मुंबई हे शिवसेनेचे खरे बलस्थान. त्याचा कौल कोणाला मिळतो हे स्पष्टपणे महापालिका निवडणुकीतून दिसणार होते. मुंबईकरांची शिवसेना कोणाची याचे उत्तर निकालाने मिळाले आहे. शिंदे शिवसेना आणि ठाकरे सेना परस्परविरोधात ज्या मतदारसंघात होते तेथेही मराठीजनांनी ठाकरेंच्या बाजूने कौल दिला आहे. फार कमी मतदारसंघात शिंदे सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. महापालिकेतील सत्ता भले ठाकरे यांच्यापासून दूर राहिली असली तरी खरी शिवसेना त्यांच्याकडेच असल्याची ग्वाही मुंबईकरांनी दिली आहे. तसे पाहायला गेले तर महापालिकेत स्वबळावर शिवसेना कधीच सत्तेवर आली नव्हती. गेल्या 25 वर्षांत मुंबईची सत्ता राबविताना त्यांना कोणत्या ना कोणत्या पक्षाची मदत घ्यावी लागली होती. 1997 पासूनचे महापालिकेतील संख्याबळ पाहिले तर ही बाब लक्षात येते. 2017 मध्ये भाजप 82 आणि एकत्रित शिवसेना 84 असे संख्याबळ असतानाही ठाकरे यांना राजकीय तडजोडी कराव्या लागल्या होत्या. यामुळे शिवसेनेची मुंबईत जबर पीछेहाट वगैरे सर्व काही खोटे असून वास्तवाच्या जवळ जाणारे नाही. तसेच भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय चातुर्य, धुरंधर नीतीचे वर्णनही वास्तवापासून दूर आहे. मुंबईचे महापौरपद कदाचित भाजपच्या ताब्यात येऊ शकेल किंवा अन्य काही याबाबत घडले तरी हे त्यांचे यश निर्भेळ नाही. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर मुंबई मिळवता आलेली नाही. त्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेची भागीदारी असणार हे नक्की. दुसरे म्हणजे ठाकरे बंधू रिंगणात होते ते केवळ मराठी माणसांच्या बळावर. काही अपवाद वगळता बाळासाहेबांवर निष्ठा असलेल्या मराठीजनांनी त्यांना नाराज केले नाही. दोघांना मिळालेले 71 नगरसेवक त्यांना महापौरपदापर्यंत घेऊन जाणारे नसले तरी मराठीजनांच्या अधिक जवळ घेऊन गेले हे महत्त्वाचे. ठाकरे ब्रँड संपल्याच्या अनेकांनी वावड्या उठवल्या तरी ठाकरे म्हणजे मुंबईतील मराठी माणूस हे नाते आजही अतूट असल्याचे दिसून आले. भाजपच्या ताब्यात मुंबई महापालिका जाऊ नये यासाठी काँग्रेसने आवश्यक लवचिकता दाखवली असती तरी ठाकरे बंधू सत्तेपर्यंत पोहचू शकले असते. मुंबईतील काँग्रेसच्या काही नेत्यांचा अंहकार आडवा आल्याने काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ शकली नाही. काँग्रेसला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वावडे असले तरी शिवसेनेबरोबर युती करून ठाकरेंच्या वाट्यातील काही जागा मनसेला सोडता आल्या असत्या. दोन्ही बाजूंनी हा मुत्सद्दीपणा दाखवला असता तर मुंबईचे आजचे राजकीय चित्र वेगळे दिसले असते. 2026 च्या निवडणुकीत भाजपला 15,40,800 मतांसह (89 जागा) मिळाल्या. 2017 मध्ये भाजपला 13,94,464 मतांसह 82 जागा मिळाल्या होत्या. यावेळी ठाकरे शिवसेनेला 13 लाख 23 हजार 279 मतांसह 65 जागा मिळाल्या. 2017 मध्ये शिवसेनेला 14 लाख 43 हजार 939 मतांसह 84 जागा मिळाल्या होत्या. यावेळी शिंदे शिवसेनेला 6 लाख 98 हजार 289 (29 जागा) आणि मनसेला 3 लाख 32 हजार 960 मते मिळाली आहेत. 2017 आणि 2026 च्या मतांचा विचार केला तर भाजपच्या मतांत फार वाढ झालेली नाही आणि ठाकरेंच्या मतांमध्ये फार घट झाली नसल्याचे दिसते. भाजपने हिंदू मतांवर तर ठाकरे यांनी मराठी मतांवर लक्ष केंद्रित केले होते. भाजपच्या मतदारांचा पाया मोठा होता. ठाकरे बंधूंना मिळालेली मते केवळ मराठीच असण्याची शक्यता अधिक आहे. या निवडणुकीतील भाजपच्या विजयाची चर्चा कमी झाली आणि ठाकरे शिवसेनेच्या पराभवाची चर्चा अधिक झाली. त्याचे कारण म्हणजे भाजपला अपेक्षित यश मिळवण्यात आलेले अपयश आणि सत्तेपासून दूर राहिले तरी ठाकरे शिवसेनेला मराठीजनांचा मिळालेला पाठिंबा. मुंबईकर मराठीजनांच्या दृष्टीने ठाकरेंना पराभवातही मिळालेला हा विजय आहे. मराठीजनांची एकजूट राखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मनसेची मदत घेतली तरी राज ठाकरे यांना आपला करिश्मा मतांमध्ये परिवर्तित करता आला नाही. ठाकरे, मनसे आणि शिंदे शिवसेनेची मते एकत्रित केली तर ती भाजपच्या मतांहून कितीतरी अधिक होतात. मुंबई पालिकेवर सत्ता राबविण्यासाठी मराठीजनांच्या एकजुटीबरोबर भविष्यातील विकासांच्या स्वप्नांची जोड देण्याची आवश्यकता आहे. केवळ मराठीजनांच्या मतावर अवलंबून राहता येणार नाही, हे ओळखूनच उद्धव ठाकरे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो कधीच फलद्रूप झाला नाही. तसेच मी मुंबईकर मोहीम राबवली होती. तूर्त शिवसेना आणि मराठीजनांचा भविष्यातील मार्ग संघर्षाचाच असणार आहे, हे नक्की.