Iran-US War: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन जहाजांना अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा सुरुंग पेरणाऱ्या इराणच्या कोणत्याही लहान-मोठ्या नौका दिसताच त्यांना थेट नष्ट करण्याचे स्पष्ट आदेश ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला दिले आहेत. ट्रम्प यांच्या या ‘शूट अँड किल’च्या भूमिकेमुळे आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. इराणी तेलाची तस्करी करणाऱ्या एका टँकरवर अमेरिकन सैन्याने जप्तीची कारवाई केल्यानंतर काही वेळातच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे ही घोषणा केली. जागतिक स्तरावरील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या एकूण व्यापारापैकी २० टक्के व्यापार याच मार्गावरून होतो, त्यामुळे या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही देशांत संघर्ष सुरू आहे. इराणच्या निमलष्करी रिव्होल्युशनरी गार्ड्सने होर्मुजमध्ये तीन मालवाहू जहाजांवर हल्ला करून त्यापैकी दोन जहाजे ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हे कठोर पाऊल उचलले आहे. आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, होर्मुज सामुद्रधुनीच्या पाण्यात बारूदी सुरुंग पेरणाऱ्या इराणच्या कोणत्याही बोटींना कंठस्नान घालताना नौदलाने कोणताही संकोच बाळगू नये. तसेच, या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील सुरुंग हटवण्यासाठी राबवण्यात येत असलेली मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. हे काम सध्याच्या तुलनेत तीनपट अधिक वेगाने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकन सैन्य या मार्गातील अडथळे दूर करून सागरी व्यापार सुरक्षित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, अमेरिकन संरक्षण विभागाने (पेंटागन) हिंद महासागरात जप्त केलेल्या ‘मॅजेस्टिक एक्स’ या तेल टँकरचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. गिनीचा ध्वज असलेल्या या जहाजाच्या डेकवर अमेरिकन सैनिकांचा वावर या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. इराणला बेकायदेशीरपणे मदत करणाऱ्या नेटवर्कला रोखण्यासाठी आणि जागतिक सागरी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अमेरिका अशा कारवाया सुरूच ठेवणार असल्याचे पेंटागनने आपल्या निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेच्या या आक्रमक पवित्र्यावर इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.