Dharmendra Family: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र, त्यांच्या दमदार अभिनयासोबतच खाजगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिले. ८९ वर्षांचे धर्मेंद्र आता या जगात नाहीत, पण आपल्या मागे एक यशस्वी कुटुंब सोडून गेले आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हिंदी सिनेसृष्ट्रीवर ६५ वर्षांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या या ‘ही-मॅन’च्या संपूर्ण कुटुंबाबद्दल आज आपण जाणून घेऊया. धर्मेंद्र यांनी दोन विवाह केले — पहिली पत्नी प्रकाश कौर आणि दुसरी पत्नी बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी. धर्मेंद्रच्या मागे कुटुंबात कोण कोण आहे आणि ते काय करतात ? पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याकडील कुटुंब. धर्मेंद्र यांनी १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्याशी विवाह केला. या जोडप्याला चार मुलं आहेत. सनी देओल (अजय सिंह देओल) आणि बॉबी देओल (विजय सिंह देओल) या दोन्ही मुलांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले आहे. सनी देओल यांनी पूजा देओल यांच्याशी लग्न केले असून त्यांना करण देओल आणि राजवीर देओल हे दोन मुलगे आहेत. हे दोघेही आता अभिनय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत. बॉबी देओल यांनी तान्या देओल यांच्याशी लग्न केले असून त्यांना आर्यमन देओल आणि धरम देओल हे दोन मुलगे आहेत. धर्मेंद्र यांच्या कन्या विजेता देओल (विवेक गिल यांच्या पत्नी) आणि अजीता देओल (किरण चौधरी यांच्या पत्नी) यांनी मात्र सिनेसृष्टीपासून अंतर ठेवत, प्रसारमाध्यमांच्या झगमगाटापासून दूर, खासगी आयुष्य जगणे पसंत केले आहे. विजेता गिल यांना प्रेरणा आणि साहिल गिल ही दोन मुले आहेत. अजीता चौधरी यांना निकिता आणि प्रियंका चौधरी या दोन मुली आहेत. दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्याकडील कुटुंब. १९८० मध्ये, धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला. या जोडप्याला दोन मुली आहेत. ईशा देओल तिने आपल्या आई-वडिलांप्रमाणे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ईशा यांनी व्यावसायिक भरत तख्तानी यांच्याशी लग्न केले होते, पण २०२४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. ईशा यांना राध्या आणि मिराया अशा दोन मुली आहेत. अहाना देओल तिने व्यावसायिक वैभव वोहरा यांच्याशी लग्न केले असून ती परदेशात स्थायिक झाली आहे. अहाना आणि वैभव यांना एक मुलगा आणि दोन मुली अशी एकूण तीन अपत्ये आहेत. धर्मेंद्र यांनी आपल्या मागे ६ मुलं (४ मुलगे आणि २ मुली), सुना, जावई आणि एकूण १३ नातवंडं असा मोठा आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत स्थापित असलेला परिवार मागे सोडला आहे. त्यांचे सिनेक्षेत्रातील योगदान आणि कुटुंबाला दिलेला आधार नेहमीच स्मरणात राहील.