Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रमुख नेते धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांच्याविरुद्ध सुरू असलेला कायदेशीर लढा आता पुन्हा तीव्र झाला आहे. अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयने कनिष्ठ न्यायालयाने दिलेला दोषमुक्तीचा आदेश रद्द ठरवत, मूळ फिर्याद पुन्हा सुरू (पुनरुज्जीवित) करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. नेमकं प्रकरण काय? प्रकरण २०११-१२ या काळातील आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पुस व तळणी शिवारातील शेतकरी मुंजा किशनराव गित्ते यांची मौजे पूस शिवारातील गट क्रमांक २८ मधील ३ हेक्टर १२ आर जमीन ‘जगमित्र शुगर मिल्स’ या नियोजित साखर कारखान्याच्या नावाने खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारात धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सूर्यभान मुंडे यांनी फिर्यादी मुंजा गित्ते तसेच इतर साक्षीदारांना कारखान्यात नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. संपूर्ण व्यवहार केवळ ५० लाख रुपयांत ठरला होता. मात्र, ठरलेल्या रकमेपैकी फक्त १० लाख रुपयेच फिर्यादीला मिळाले. उर्वरित ४० लाख रुपयांचा धनादेश वटवण्यापूर्वीच बाद (बाऊन्स) झाला. पोलिसांनी दखल घेतली नाही; उच्च न्यायालयात याचिका पैसे न मिळाल्याने आणि वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने मुंजा गित्ते यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी तपास करून धनंजय मुंडे व इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), ४६५, ४६८, ४७१ (खोटी कागदपत्रे), ४१९ (खोटी ओळख), ३४ (सामूहिक कट) अन्वये दोषारोपपत्र दाखल केले होते. स्थगिती मिळाली, पण खटला थांबणार नाही या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल करून खटल्याला स्थगिती मागितली गेली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत अपील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खटल्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र, अपील निकालानंतर हा खटला पुन्हा सुरू होणार असल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी कायम राहणार आहेत. या प्रकरणाचा निकाल आणि पुढील सुनावणी राजकीय वर्तुळात मोठ्या उत्सुकतेच्या विषय ठरला आहे.