मुंबई : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीला या निवडणुकीत मोठे यश मिळाले असून, विशेषतः भाजपने बाजी मारली आहे. एकूण नगराध्यक्षपदांपैकी १२९ पदे भाजपने जिंकली आहेत, तर महायुतीला एकूण ७५ टक्के नगराध्यक्षपदे मिळाली आहेत. नगरसेवकांच्या बाबतीतही भाजपने मोठी झेप घेतली असून, २०१७ मध्ये १,६०२ नगरसेवक असताना आता थेट ३,३९५ नगरसेवक निवडून आले आहेत. म्हणजेच सुमारे ४८ टक्के नगरसेवक भाजपचे आहेत. या दणदणीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महायुतीच्या विजयाचे भाकीत वर्तवले. मुंबई महापालिकेच्या निवडणुका १५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान आणि १६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असून, त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत यापेक्षा चांगले निकाल मिळतील – फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जनतेच्या मनात काय आहे, हे आजच्या नगरपरिषद निकालाने स्पष्ट झाले आहे. महायुतीला नगरपालिका निवडणुकीपेक्षा महापालिका निवडणुकीत आणखी चांगले निकाल मिळतील. यापेक्षा चांगला परफॉर्मन्स आमचा राहील. जिथे महायुती सत्तेत नाही, तिथेही आम्ही विकासकामे करू. माझ्या मागच्या कार्यकाळात राज्यातील सुमारे २०० शहरांना पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी निधी दिला होता. केंद्र सरकारच्या धोरणानुसार शहरीकरण हा अभिशाप नाही, तर नियोजित शहरीकरण केले तर ते ६५ टक्के जीडीपी निर्माण करू शकते आणि सामान्य माणसाचे जीवन बदलू शकते. हेच धोरण आम्ही आगामी काळात राबवू.” नागपूर आणि इतर जिल्ह्यांच्या निकालावर भाष्य नागपूर जिल्ह्यातील यशाबाबत बोलताना ते म्हणाले, “नागपूर जिल्ह्यात आम्हाला चांगले यश मिळाले आहे. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष श्रेय आहे. त्यांनी प्रत्येक नगरपालिकेत बारकाईने लक्ष घातले. कामठीत ३०-३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. गडचिरोलीतही चांगले यश मिळाले. १५ नगरपालिकांमध्ये आम्ही बहुमतात आलो. चंद्रपूरमध्ये ज्या ठिकाणी यश मिळाले नाही, त्या कारणांचा आम्ही मिमांसा करू आणि कमतरता दूर करू.” महायुतीच्या यशाचे श्रेय आणि अभिनंदन नगरपरिषद निकालांचे विश्लेषण करताना फडणवीस म्हणाले, “भाजपला १२९ नगराध्यक्षपदे मिळाली आहेत. महायुतीला एकूण ७५ टक्के नगराध्यक्षपदे मिळाली आहेत. नगरसेवकांच्या संख्येतही आम्ही दुप्पट झालो आहोत. आम्हाला प्रचंड जनसमर्थन मिळाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या पक्षांनीही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एक प्रकारे आम्ही विधानसभा निवडणुकीसारखाच परफॉर्मन्स दिला आहे.” या निकालाने महायुतीचा आत्मविश्वास वाढला असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. आता सर्वांच्या नजरा मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकांकडे लागल्या आहेत.