Devdutt Padikkal : कर्नाटकचा युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये पुन्हा एकदा आपल्या बॅटची जादू दाखवली आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी अहमदाबादच्या गुजरात कॉलेज ग्राऊंडवर राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने ८२ चेंडूत ९१ धावांची आक्रमक खेळी साकारली. या खेळीत १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या धावांसह देवदत्तने स्पर्धेत ६ डावांत ६०५ धावा पूर्ण केल्या असून त्याची सरासरी १००.८३ इतकी आहे. देवदत्त पड्डीकलचा अद्भुत विक्रम या कामगिरीने देवदत्तने इतिहास रचला आहे. तो विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे ज्याने तीन वेगवेगळ्या हंगामांत ६०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. याआधी २०१९-२० मध्ये त्याने ६०९ धावा तर २०२०-२१ मध्ये ७३७ धावा (सलग ४ शतके) केल्या होत्या. सध्याच्या हंगामात त्याने ४ शतके आणि एक अर्धशतक झळकावले असून कर्नाटकला मजबूत स्थितीत ठेवले आहे. यंदाच्या स्पर्धेतील देवदत्तचा झंझावाती फॉर्म पाहता त्याने झारखंडविरुद्ध १४७, केरळविरुद्ध १२४, पुदुच्चेरीविरुद्ध ११३ आणि त्रिपुराविरुद्ध १०८ धावांच्या खेळ्या साकारल्या होत्या. राजस्थानविरुद्धच्या ९१ धावांमुळे तो पाचव्या शतकापासून फक्त ९ धावांनी चुकला, तरीही त्याची सातत्यपूर्ण कामगिरी चाहत्यांना आणि निवडकर्त्यांना प्रभावित करत आहे. देवदत्तची कारकीर्द उतार-चढावांनी भरलेली राहिली आहे. २०२०-२१ हंगामात लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग ४ शतके झळकावून त्याने जगाचे लक्ष वेधले होते. मात्र त्यानंतर पोटाच्या गंभीर आजारामुळे त्याला जवळपास दोन वर्षे पूर्ण फिटनेस मिळाली नाही आणि खेळण्यात अडथळे आले. आयपीएलमधील कामगिरी आयपीएलमध्ये त्याची सुरुवात धमाकेदार झाली. २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) साठी डेब्यू करताना त्याने ४७३ धावा करून इमर्जिंग प्लेयर अवॉर्ड जिंकला. पुढच्या हंगामातही त्याने ४००+ धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध ५१ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी साकारली. मात्र चांगल्या कामगिरीनंतरही आरसीबीने त्याला रिलीज केले. राजस्थान रॉयल्सकडे गेल्यानंतर मधल्या फळीत खेळावे लागल्याने त्याचा फॉर्म थोडा कमी झाला. २०२२ मध्ये ३७६ आणि २०२३ मध्ये २६१ धावा. नंतर त्याला लखनौ सुपर जायंट्सकडे ट्रेड करण्यात आले. २०२५ च्या मेगा लिलावात तो पुन्हा आरसीबीकडे परतला आहे. आंतरराष्ट्रीय कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर देवदत्तने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २ टी२०आय सामने खेळले. २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध धरमशाला कसोटीत टेस्ट डेब्यू करताना पहिल्या डावात ६५ धावा केल्या. त्याच वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पर्थ कसोटीत खेळला, मात्र त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. सध्या विजय हजारे ट्रॉफीतील त्याचा अफलातून फॉर्म पाहता देवदत्तची भारतीय वनडे संघात निवड होण्याची चर्चा जोरात आहे. मधल्या फळीत किंवा सलामीला त्याची आक्रमकता आणि सातत्य भारताला उपयुक्त ठरू शकते. निवडकर्ते आणि चाहते आता त्याच्या पुढच्या खेळीकडे उत्सुकतेने पाहत आहेत.