चंद्रपूर: राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा (Municipal Council Elections) प्रचार आज सायंकाळी थंडावला. उद्या, २ डिसेंबर रोजी मतदान असून, त्यापूर्वीच्या अखेरच्या टप्प्यात प्रचाराला जबरदस्त गती मिळाल्याचे दिसून आले. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांनी सभांचा धडाका लावला. विशेष म्हणजे, मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेलिब्रिटींचाही मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याच सेलिब्रिटी प्रचाराच्या यादीत आता चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या सहभागाची भर पडली. ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात असलेल्या मूल नगर परिषदेत काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट आणि अटीतटीची लढत आहे. मतदानाला अवघे काही तास उरले असताना, काँग्रेसच्या महिला उमेदवारांसाठी गौतमी पाटील हिने प्रचारात आघाडी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नथणी-गमछा परिधान करत ‘गौतमी’ मैदानात – मूल शहरातील काँग्रेस उमेदवार एकता समर्थ यांच्या प्रचारासाठी गौतमी पाटील ओपन जीपमधून रोड शो मध्ये सहभागी झाली होती. नाकात नथणी आणि गळ्यात गमछा परिधान करून तिने चाहत्यांना मतदानाचे आवाहन केले. मतदारांना आकर्षित करण्याच्या या प्रयत्नाचा भाग म्हणून गौतमीच्या या रोड शोला मूलमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मूल येथील दुर्गा मंदिरापासून सुरू झालेला गौतमीचा रोड शो संपूर्ण शहरात फिरला. यावेळी तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी, तिला पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. अनेकांनी तिचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. गौतमीनेही चाहत्यांसमवेत उत्साहाने फोटो काढले. या रोड शोमध्ये गौतमीसोबत काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवारही ओपन जीपमध्ये उपस्थित होते. निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय पक्ष मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत असल्याचे चित्र मूलमध्ये गौतमी पाटीलच्या रोड शोने दाखवून दिले. आता उद्या २ डिसेंबर रोजी मतदानाच्या माध्यमातून जनता कोणाला कौल देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.