महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. मुंबईत ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) यांनी शिवसेना (उबाठा) आणि मनसेची युती जाहीर केली असताना, महायुतीतील पक्षांनीही एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress News) मोठी राजकीय खेळी करत राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) सोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही युती जाहीर केली. ही युती प्रामुख्याने महानगरपालिका निवडणुकीसाठी असून, जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही एकत्र लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्येही रासपची काँग्रेसला मदत झाली होती, असा उल्लेख करण्यात आला. LIVE || प्रदेशाध्यक्ष मा.श्री हर्षवर्धन सपकाळ यांचा मध्यमांशी संवाद. https://t.co/MbAGPUnRcd — Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 24, 2025 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले? युतीची घोषणा करताना सपकाळ म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणाचा वेध घेताना आम्ही सोबत काम करण्याबाबत चर्चा केली. भाजपा लोकशाहीला संपवत आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा आमचा विचार आहे. हुकूमशाहीच्या विरोधात एकत्र लढले पाहिजे, या विचाराने आम्ही एकत्र येत आहोत. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढणार आहोत. नगरपंचायत-नगरपरिषदांमध्येही त्यांची आम्हाला मदत झाली आहे. आगामी काळातही आम्ही सोबत लढू.” महादेव जानकरांची भूमिका रासप अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, “देशाचे संविधान वाचवायचे असेल, लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेससोबत राहिले पाहिजे. यासाठी आम्ही काँग्रेससोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. मला काँग्रेसने बोलावले नव्हते, मी स्वतःहून आलो आहे. कारण देशासाठी एकत्र लढण्याची गरज आहे.” पुढे ते म्हणाले, “नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या २८८ ठिकाणी जे धोरण होते, तेच धोरण महानगरपालिका निवडणुकीतही आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा होती. मोठ्या आघाड्या झाल्या असत्या तर कदाचित कार्यकर्त्यांना संधी मिळाली नसती. महाराष्ट्रात विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्या काळात मुल पळवणारी टोळी आली होती, आता राजकीय पक्ष चोरणारी टोळी आली आहे.” ही युती महानगरपालिका निवडणुकीतील समीकरणे बदलू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर काँग्रेसची ही खेळी विरोधी आघाडीला बळ देणारी ठरू शकते. आता जागावाटप आणि उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.