नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची २७ डिसेंबरला दिल्लीत बैठक होणार आहे. त्यामध्ये देशातील सध्याची राजकीय स्थिती आणि इतर प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे समजते. काही राज्यांतील विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळेही संबंधित बैठकीचे महत्व वाढले आहे.बिहारमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. ती कॉंग्रेस आणि मित्रपक्षांना मोठा राजकीय हादरा देणारी ठरली. त्या निवडणुकीनंतर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिल्यांदाच बैठक होणार आहे. मनरेगाच्या जागी नवा कायदा आणण्याचे पाऊल मोदी सरकारने उचलले. त्याला विरोधी पक्ष आणि विशेषत: कॉंग्रेस कडाडून विरोध दर्शवत आहे. पक्षाने देशव्यापी निदर्शने छेडण्याचे सूतोवाच केले आहे. त्याविषयी आगामी बैठकीत कार्यक्रम निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. नववर्षात तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी ४ महिन्यांपेक्षा कमी अवधी उरला आहे. त्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ते पाहता कार्यकारिणी बैठकीत आगामी निवडणुकांसाठीची रणनीती निश्चित करण्यावर कॉंग्रेसचा भर राहील, असे संकेत मिळत आहेत.