मुंबई : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महायुतीला मोठे यश मिळाले आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून पक्षाने १२० नगराध्यक्षपदे जिंकली आहेत. एकूण महायुतीला २१४ नगराध्यक्षपदे मिळाली आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीला अवघी ५० नगराध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले. यात काँग्रेसने ३०, राष्ट्रवादी शरद पवार गटाने १० तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट)ने १० नगराध्यक्षपदे जिंकली. महाविकास आघाडीच्या कामगिरीत काँग्रेसची तुलनेने चांगली बाजू राहिली, तरी एकूणच आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या निकालाने महायुतीचा आत्मविश्वास वाढला असून, आता सर्वांच्या नजरा राज्यातील महापालिका निवडणुकांकडे लागल्या आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. काँग्रेसने यापूर्वी मुंबईतील २२७ जागा स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे, मात्र समविचारी पक्षांना सोबत घेण्याची तयारी दाखवली आहे. मुंबईत अनुसुचित जाती (एससी) प्रवर्गातील ४९ जागा असल्याने काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत युतीस उत्सुक आहे. वंचितच्या जनाधारामुळे ही युती काँग्रेसला फायदेशीर ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दुसरीकडे, मुंबई महापालिकेसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांची युती होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटालाही या युतीत सामावून घेण्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना (ठाकरे गट) आपल्या कोट्यातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला जागा देण्यास तयार असल्याचे समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने मनसे आणि एमआयएमसोबत युती न करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईत काँग्रेस शिवसेना (ठाकरे गट) ला सोडून वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याची दाट शक्यता आहे. नगरपरिषद निकालाने महायुतीला मजबुती दिली असली तरी महापालिका निवडणुकीत युती-अयुतीच्या समीकरणांमुळे चुरस वाढणार आहे. विशेषतः मुंबईसारख्या महत्त्वाच्या महापालिकेत नवे राजकीय समीकरण तयार होत असल्याने निकालाची उत्सुकता अजून वाढली आहे.