Zilla Parishad and Panchayat Samiti elections | राज्यातील 29 महापालिका निवडणुकींच्या निकालानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. अनेकदा निवडणुकांदरम्यान ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली जाते. त्यादृष्टीने आता पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत लिहिले की, “महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाडला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी केवळ मतदार उदासिन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक आहे.” “राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट प्रणालीचा वापर करण्यात आला नाही. मताची खात्री करण्याचा मतदाराचा अधिकार हिरावला गेला. त्यात भर म्हणजे मतदारांच्या बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर पुसली जात होती. या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. याचा आयोगाने गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. आयोगाच्या चुकीच्या नियोजनामुळे यावेळी पालिका निवडणुकीत मतदान कमी टक्के झाला आहे,” असा आरोपही पटोले यांनी केला आहे. ….मग, महाराष्ट्रातच ईव्हीएमचा हट्ट का? Zilla Parishad and Panchayat Samiti elections | “देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग, महाराष्ट्रातच ईव्हीएमचा हट्ट का? व कोणाच्या फायद्यासाठी?” असे प्रश्न मतदार विचारात असल्याचे पटोले यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. “मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास करावी लागणारी वणवण, हजारो मतदारांना मतदान न करताच परत जाण्याची येणारी वेळ, या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक आहेत, ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक आहे.” ‘निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्या’ Zilla Parishad and Panchayat Samiti elections | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लोकशाहीच्या कणा आहेत. निवडणुकीबाबत जर संशय, अविश्वास आणि गैरव्यवस्थेचे वातावरण राहिले तर ते लोकशाहीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहे. जनभावनेचा विचार करून राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्याव्या. यामुळे लोकशाहीवरील मतदारांचा विश्वास वाढेल,” अशी मागणी पटोले यांनी केली आहे. हेही वाचा: ZP Election 2026: जिल्हा परिषदेसाठी भाजप-शिवसेना एकत्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र दे धक्का