मुंबई – राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. या शस्त्रक्रियेनंतर भुजबळ यांचा पहिला फोटो आज समोर आला आहे, जो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आज मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी रुग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांची विचारपूस केली. या भेटीदरम्यान काढलेला फोटो नांदगावकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत भुजबळ यांच्या हाताला सलाईन आणि चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. नांदगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “मतभेद असावे, मनभेद नसावे’, राज्यातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांची आज भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. यावेळी त्यांच्याबरोबर जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसैनिक म्हणून काम करत असताना भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते होते. दोघांमधील सारखा दुवा म्हणजे “ठाकरे परिवार”. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांनी ही मनापासून आनंद व्यक्त केला. त्यांची आणि माझी राजकीय विचारधारा नंतरच्या काळात वेगळी असली तरी ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याबद्दल मनात आदरच आहे. वयाच्या या टप्प्यात ही त्यांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्यांचा लढवय्या स्वभाव. अनेकदा प्रवाहाविरोधात जाऊन लढणारे भुजबळ साहेब वयाच्या या टप्प्यात ही लढवय्ये आहेत. मा बाळासाहेब व एकूणच ठाकरे परिवारातील जुन्या आठवणी, आधीच्या काळातील केलेला संघर्ष त्यातून मिळविलेले यश, राजकारणाची बदलेली शैली याबद्दल ते मनापासून व्यक्त झाले. हॉस्पिटल मध्ये असले आणि शस्त्रक्रिया झाली तरी एकदम मनापासून ते व्यक्त होत होते. आम्ही दोघेही जुन्या गोष्टी आठवून भाऊक झालो. आपल्या राज्याची संस्कृती आहे की आपल्या इथे राजकीय विरोधक असतात पण दुश्मन नव्हे. कारण राजकारणात मतभेद असावे पण मनभेद नसावे. ही संस्कृती हळूहळू लुप्त होत आहे असे सध्या जाणवते आहे. राजकारणातील धडधडती तोफ म्हणून ओळखले जाणारे भुजबळ साहेब हे लवकरात लवकर स्वस्थ होऊन परत सक्रीय व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”