Maharashtra Sadan Scam : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) देखील छगन भुजबळ ( Chhagan bhujbal )यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. Chhagan Bhujbal यापूर्वी न्यायालयीन पातळीवर दिलासा मिळाल्यानंतर आता ईडीकडूनही क्लीन चिट मिळाल्याने भुजबळ यांच्यावरील सर्व आरोपांवर पडदा पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेससाठीही हा मोठा दिलासा मानला जात आहे. 13.5 कोटी रुपये दिल्याचा कोणताही पुरावा नाही सप्टेंबर 2021 मध्ये विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले होते. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले होते की, विकासकाने भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबीयांना 13.5 कोटी रुपये दिल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. तसेच, एसीबीकडून मांडण्यात आलेला नफा-तोट्याचा हिशोब चुकीचा आणि कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचेही न्यायालयाने सांगितले होते. न्यायालयाने असेही स्पष्ट केले होते की, कंत्राटासंदर्भातील अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, परिवहन मंत्री तसेच सात वरिष्ठ नोकरशहांच्या समितीसमोर सादर करण्यात आला होता. त्यामुळे केवळ चुकीची माहिती देऊन या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल झाली, असे मान्य करणे कठीण असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. 2015 मध्ये 17 मालमत्तांवर छापे महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2015 मध्ये भुजबळ यांच्या मुंबई, ठाणे आणि नाशिक येथील 17 मालमत्तांवर छापे टाकले होते. पदाचा गैरवापर आणि फसवणुकीचे आरोप ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कारवाईत मुंबईतील 7, ठाणे आणि पुण्यात प्रत्येकी 2, तर नाशिकमधील 5 मालमत्तांचा समावेश होता. हेक्सवर्ल्ड प्रकरणातही दिलासा दरम्यान, नवी मुंबईतील ‘हेक्सवर्ल्ड’ गृहनिर्माण प्रकल्प प्रकरणातही भुजबळ कुटुंबाला यापूर्वी दिलासा मिळाला होता. या प्रकल्पात सदनिका खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, सप्टेंबर 2021 मध्ये विशेष न्यायालयाने या दोघांनाही या प्रकरणातून दोषमुक्त केले होते. एसीबी आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांच्या प्रकरणांतून सुटका झाल्याने छगन भुजबळ यांना मोठा कायदेशीर आणि राजकीय दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.