जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या २२ एप्रिल रोजी भीषण दहशतवादी हल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने सोमवारी सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा, तिची सहयोगी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) आणि पाकिस्तानमधील एका दहशतवादी हँडलरचा समावेश आहे. जम्मू येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या तब्बल १,५९७ पानांच्या आरोपपत्रात कट, हल्ल्याचे नियोजन व अंमलबजावणीतील आरोपींची भूमिका मांडली आली आहे. या प्रकरणात प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबा आणि द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनांवरही थेट आरोप ठेवण्यात आले आहेत. या पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी हल्ल्यात धर्मावर आधारित लक्ष्य ठेवून हत्या करण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. आरोपपत्रात पाकिस्तानी हँडलर दहशतवादी साजिद जट्ट याचे नावही आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. तसेच श्रीनगरजवळील दचिगाम परिसरात २९ जुलै रोजी ऑपरेशन महादेवदरम्यान लष्कराने ठार केलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांची नावेही आरोपपत्रात आहेत. या तिघांची ओळख फैसल जट्ट उर्फ सुलेमान शाह, हबीब ताहिर उर्फ जिब्रान आणि हमजा अफगाणी अशी आहे. एनआयएने या सर्व आरोपींवर भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचे फौजदारी कलमही लावले आहे. जवळपास आठ महिने चाललेल्या सखोल आणि वैज्ञानिक तपासातून या हल्ल्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने स्पष्ट केले आहे. तसेच, दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या परवेझ अहमद आणि बशीर अहमद जोथार यांच्याविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्यांनी चौकशीदरम्यान हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख उघड केली होती.