अहिल्यानगर: नेवासा येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या भूकरमापक अजयभानसिंग गुलाबसिंग परदेशी (वय ४८) याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १.५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. शासकीय कामासाठी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने ही लाच मागण्यात आली होती. हे प्रकरण पाथरवाला गायगव्हाण (ता. नेवासा) शिवारातील शिवरस्त्याच्या वादातून उद्भवले आहे. तक्रारदार, त्यांचे भाऊ आणि इतर शेतकऱ्यांनी शिवरस्ता खुला करण्यासाठी ३१ जानेवारी २०२२ रोजी नेवासा तहसीलदारांकडे अर्ज केला होता. सुरुवातीला तहसीलदारांनी शेतकऱ्यांकडून मोजणी खर्च घेण्याचा आदेश दिला, परंतु उच्च न्यायालयाने हा खर्च शासनाने करावा असा निर्णय दिल्यावर शिवरस्ता मोजणी करून फेब्रुवारी २०२३ मध्ये तो खुला करण्यात आला. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम मंजूर झाले. त्यावेळी गट क्रमांक ३० तसेच पाथरवाल्यातील काही शेतकऱ्यांनी पुन्हा मोजणीसाठी अर्ज केला व शुल्क भरले. ६ जून २०२५ रोजी मोजणी अधिकारी जयदीप गाडे यांनी मोजणी केली, मात्र त्यांनी शिवरस्त्याच्या मधोमध खुणा दाखवल्याने रस्ता पुन्हा बंद झाला. रस्ता बंद झाल्याने तक्रारदाराच्या भावाने ३० जूनला पुन्हा भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी अर्ज केला. याच वेळी भूकरमापक अजयभानसिंग परदेशी यांनी तक्रारदाराकडे संपर्क साधला. पूर्ववत मोजणी करून देण्याकरता, तसेच भूकरमापक जयदीप गाडे यांच्यावर आपला वैयक्तिक प्रभाव वापरून स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी परदेशीने ३ डिसेंबर रोजी १.५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. या मागणीनंतर तक्रारदाराने ACB कडे संपर्क साधला. त्यानुसार, नाशिक ACB चे पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्यासह अंमलदार प्रफुल्ल माळी, विलास निकम, विनोद पवार यांनी सापळा रचला. काल, गुरुवारी (४डिसेंबर) लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारत असतानाच परदेशी याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नगरच्या पथकाचे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट अधिक तपास करत आहेत. भूमी अभिलेख कार्यालयातील या प्रकारामुळे शासकीय कामकाजातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.