Rupali Chakankar : नाशिकमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या आज एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी त्या पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या आहेत. नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात रूपाली चाकणकर यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रूपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अशोक खरातसोबतचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले. याच प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन पायउतार व्हाव लागले. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः रूपाली चाकणकर यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, 22 मे पर्यंत अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातने स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थेच्या विश्वस्त मंडळावर सलग दोन वेळा रुपाली चाकणकर सदस्या होत्या. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांची देखील चौकशी करण्यात आली होती. कल्पना खरातचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश अशोक खरात प्रकरणात केवळ लैंगिक अत्याचार नव्हे तर आर्थिक फसवणुकीचे प्रकार देखील उजेडात आली आहेत. शिर्डी येथील जमीन खरेदी फसवणूक व अवैध गुन्ह्यात पोलिसांनी खरातवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपासाला वेग आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पोलिस त्याची पत्नी कल्पना खरातच्या शोधात आहे. अजूनही कल्पना यांचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. आज अशोक खरातची कोठडी संपणार असून जमीन खरेदी प्रकरणातील साक्षीदार व अशोक खरात यांची समोरासमोर चौकशी सुरू आहे. हेही वाचा : Vijay Cabinet: डिजिटल योद्धे, डॉक्टर आणि तरुण चेहरे… ! विजय मंत्रिमंडळात नवीन समीकरण ; ‘हे’ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार