Prashant Jagtap | तुतारीला ‘राम कृष्ण हरी’ करत काँग्रेसचा हात धरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची काँग्रेसकडून उमेदवारी अडचणीत आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत २०१७ मध्ये निवडून आलेल्या प्रभाग प्रभाग क्रमांक २५ मधील दोन्ही जागांवर पवार गटाने दावा केला आहे. तसेच या जागांचा निर्णय स्वतः सुप्रिया सुळे घेतील असेही काँग्रेस नेत्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे जगताप यांच्या उमेदवारी वरून महाविकास आघाडी म्हणून एकत्र येणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटात नव्या वादाला तोंड फुटणार आहे. गेल्या काही दिवसापासून पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या एकत्र येण्यावरून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून कोणता पक्ष कोणासोबत आघाडी करणार याबाबत राजकीय चर्चा आणि धक्के बसत आहेत. तशातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध करत प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत राजीनामा दिला. त्यानंतर, जगताप यांनी आपण कोणत्याही पक्षात न जाता मतदारांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. जगताप यांनी दोनच दिवसात थेट मुंबई गाठत काँग्रेसचा हात धरला. तर जगताप यांनी याची कल्पनाही स्थानिक नेत्यांना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे काँग्रेसमध्येही नाराजी आहे. हडपसर भागात वानवडी मध्ये काँग्रेसचेही प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला विरोध होता. त्यातच, आता काँग्रेस आणि राशप मध्ये पुन्हा आघाडीसाठी चर्चा सुरू झाल्यानंतर आता प्रशांत जगताप आणि त्यांची आई रत्नप्रभा जगताप या वानवडीमध्ये ज्या दोन जागांवर निवडून आलेले आहेत. त्या जागा राष्ट्रवादीच्या असल्याने त्या आमच्याकडेच राजकीय असे स्पष्ट करण्यात आले. तसेच या जागांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय न होता, हा निर्णय पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे स्वतः घेतील असे रशप कडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जगताप आणि रशप मध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धातून जगताप यांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर, जगताप यांच्या भूमिकेमुळे पक्षात वरिष्ठ नेते नाराज असून या राजकीय गोंधळाला तेच जबाबदार असल्याचेही वरिष्ठांचे मत आहे. त्यामुळे या दोन जागांचा तिढा न सुटल्यास या जागेवरून महाविकास आघाडीत वादही निर्माण होण्याची शक्यता आहे.